#🌹 सहवास 🌹🌹
सहवास फुल अन् सुगंधाचा, चंद्र अन् तारकांचा,
सहवास डोळे अन् आसवांचा, जन्म अन् मृत्युचा,
सहवास आनंद अन् दुःखाचा, माती अन् पावसाचा,
सहवास चहा अन् खारीचा, प्रेम अन् विरहाचा,
सहवास आत्मिक समाधानाचा, अन् तृप्तीचा.....
सहवास.... आयुष्यात मानवी मनास सहवासाची नितांत आवश्यकता असते.कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे.भावनांनी ओथंबलेलं मन, सोबत घेऊन जगणारा मानव प्राणी आहे.म्हणूनच प्रेम, आपुलकी, आधार यांचा सहवास प्रत्येकास हवा असतो.खरं तर सहवास कोणास कोणाचा लाभेल हे सांगता येतंच नाही.कारण असं म्हणतात की,हवासा सहवास दुर्मिळ असतो.आणि नकोसा सहवास संपणारा नसतो.आणि हेच जीवनाचं वास्तव आहे.पण आवडत्या माणसांचा सहवास एक पर्वणीच असते.आवडत्या लेखकाचा सहवास, आवडत्या मित्र मैत्रिणींचा सहवास, किंवा आवडत्या कोणाचाही सहवास माणसांना आनंदाची संजीवनी बहाल करतो.
सहवासाबद्दल एक वास्तव हेही आहे की,अति सहवासाने माणसं एकरुप होतात असं नाही किंवा कमी सहवासामुळे दुरावतात असंही नाही.कारण कित्येक जोडपी किंवा इतर नातेवाईक वर्षानुवर्षे एकत्र राहतात.पण प्रेमाचा,आपुलकीचा लवलेशही त्यांच्यात दिसून येत नाही.कित्येक सहवास केवळ कोरडे सहवासच असतात.थोडक्यात काय तर,अति सहवासाने प्रेम निर्माण होत़च असं नाही.मनं जुळून जिथे सहवास असतो तो खराखुरा सहवास असतो.कारण तिथे प्रेम, काळजी, आपुलकी,आदर या भावना आपोआपच दिसून येतात.प्रेम भावनेशिवाय सहवास म्हणजे सुगंधाशिवाय जणू फूल!असा सहवास एक ओझं वाटतो.जो सहनही होत नाही आणि संपतही नाही.कित्येक सहवास टाळता न येणारे असतात.पण ते असतात.पण काही सहवास हवे असतात पण लाभत नाहीत.तर काही सहवास मृगाच्या थेंबासारखे असतात.जे कधीतरी लाभतात पण उभं आयुष्य सुखावून टाकतात.असे सहवासच माणसांना जगण्याचं बळ देतात.जणू ते वाळवंटातील मृगजळ वाटतात.
माणसाला आयुष्य सुंदर जगायचे असेल तर सहवास हवेच असतात.पण कधीतरी आपणही कोणाच्या तरी आयुष्यात सहवासाचं सुंदर रुप घेऊन जावं.कोणाला तरी आपलाही सहवास हवासा वाटावा.त्यासाठी जाणीव क्षमता हवी.समजूतदारपणा हवा.मनात प्रेमाचा ओलावा हवा.माणुसकी हवी.तरच कोणासाठी तरी आपला सहवास अनमोल ठरू शकतो.पण काहीही म्हणा, सहवासात प्रचंड उत्साह असतो,जादू असते.कोमेजलेल्या मनाला पुन्हा फुलवण्याची ताकद सहवासात असते.अगदी तसंच आयुष्य गुदमरून जाईल अशी विकृती देखील सहवासात असते.म्हणूनच कोणाचा सहवास हवा,कोणाचा नको हे शेवटी ज्याने त्याने ठरवायचे असते.आपल्याला सहवास कसा भेटेल हे सांगता येत नाही,पण आपण कोणाला तरी ओढ निर्माण होईल असा सहवास देऊ शकतो.सहवास जगण्याचा आधार आहे.सहवास सुगंध आहे.सहवास वाऱ्याची झुळूक आहे.सहवास मनामनाची आस आहे.
सौ.सुधा पाटील++8459760502)