रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

मनाचा दगड

🌹मनाचा दगड 🌹

      काही दिवसांपूर्वी एका भाजी विकणाऱ्या आजीशी मनसोक्त गप्पा मारण्याचा योग आला.गप्पा मारता मारता आम्ही एकमेकींच्या मनात शिरलो आणि नकळतच औपचारिकता संपून अनौपचारिक नातं निर्माण झालं.जेव्हा अशी नाती निर्माण होतात तेव्हा कसलाही आडपडदा राहत नाही.माणूस माणसाशी क्षणात एकरुप होतो.आणि मग तिथेच मनाची कवाडं खुली होतात.मनसोक्त अनौपचारिक गप्पा सुरू होतात.मनात पुसट झालेल्या किंवा कोरलेल्या वेदना किंवा ठामपणा आपोआप बाहेर येतो.
      गप्पांची सुरवात अर्थातच कोरोनाच्या संकटावरून झाली.आजी म्हणाली,त्याला काय भ्यायच बाई! आयुष्यात अशी अनेक संकटं झेलली आहेत.मनाचा कसा दगड झालाय.कुठलं बी संकट आलं तरी, मनाला थडकून परत जातंच बघ.फक्त आपल्या मनाचा दगड अभेद हवा.मी क्षणभर आजीकडे पाहतच राहिले.मग आजीची विचारपूस करु लागले.आजीलाही माझी ओळख पटली असावी.एका जीवलग मैत्रिणीशी बोलावं तशी ती बोलू लागली.आज घडीला सत्तर वय आहे माझं! पण तुमच्या सगळ्या तरण्या पोरींना कामात माग सारते मी!आजी तु भारीच आहेस हं! तुझ्या घरी कोण कोण असतं ग?एक सून आणि नातू आहे.अग पोरी, माझ्या जन्माची हिस्ट्री लयी भयानक आहे.हे सांगताना ती अजिबात हळवी झाली नव्हती.पुढे ती म्हणाली,नवरा दारुडा होता.जीवंत होता तोवर लयी छळलं मला गड्यान!पण मीही नमले नाही.शेवटी अंथरुणाला खिळून राहिला.माझं कर्तव्य म्हणून त्याची सेवा केली.घरची गरीबी,लेकाला शाळा शिकवता आली नाही.कसंतरी मोलमजुरी करून चांगलं चाललं होतं.तोवरच पोरगा कॅन्सरने मेला.एक नातू आहे तो पण पायानं अधू आहे.आम्ही सासू सून भाजी विकून जगतोय आनंदानं! हे बघ पोरी,नियती आपल्या पुढ्यात काय वाढलं ते आपल्याला ठाव नसतय.पण मनाचा दगड केला तरंच दु:ख झेलून जगता येतंय.पण मनाचा दगड करायचा म्हणजे निष्ठूर व्हायचं नाही बरं! जीवनाचं दु: खं झेलून आपल्या वाट्याचा आयुष्य आनंदाने जगण्यासाठी कणखर व्हायचं!
    आजीच हे तत्त्वज्ञान ऐकून मी मात्र सुन्न झाले...... खरंच आपण बऱ्याच गोष्टींचा खूपच बाऊ करतो.कित्येकदा आपलं मानसिक दुबळेपण आपणास संपवून टाकतं.मनाचा दगड आयुष्यात येणाऱ्या संकटांशी आपण कशी झुंज देतो यावर अवलंबून असतो.आयुष्य हे आजमध्ये असतं.आज ,आता,हा क्षण म्हणजे आयुष्य! पण आपण उगाचच भूतकाळातील सावल्या घेऊन वर्तमानातील आनंद हरवून बसतो.संवेदनशीलता जपतंच मनाचा दगड आपणासही करता आला तर?
सौ.सुधा पाटील

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

स्त्री आणि चारित्र्य

🌹स्त्री आणि चारित्र्य 🌹

      वर्षानुवर्षे एक स्त्री पुरुष प्रधान संस्कृतीत दबली गेली आहे.आजही, ती सुधारत असली तरीही कित्येक गोष्टी तिला मागे खेचतात.तीचं मुक्त हासणं,बागडणं, ध्येयासाठी धडपडणं सारं सारं जणू एक गुन्हा आहे.आणि त्यातही 'चारित्र्य' हा शब्द जणू फक्त तिच्यासाठीच तयार झाला.मर्यादांच्या अंगणात फुलताना तिला सतत भीतीखाली जगावं लागतं.जरा काही ती चुकली कि, लगेच समाज तिला चारित्र्याच्या तराजूत तोलू लागतो.पण चारित्र्य म्हणजे नेमकं काय?ते समाजातील प्रत्येक घटकाला लागू असतं का?याचा कोणीतरी विचार करतं का?एखादीला अगदी सहजच चारित्र्यहीन अशी उपाधी देऊन आपण मोकळे होतो.
    पण चारित्र्य या शब्दात काय येतं.काय असावं याचा खरंच विचार होतो का? समाजात केवळ स्त्रियांनाच या शब्दाचा सामना का करावा लागतो?एखादी बाई एखाद्या पुरुषाला आपला मित्र मानत असेल किंवा तिचे विवाह बाह्य संबंध असतील तर लगेच तिला चारित्र्यहीन बनवून टाकलं जातं.पण तो पुरुष जो तिच्याशी संबंध ठेवतो त्याला कोणीच चारित्र्यहीन पुरुष असं म्हणत नाही.खरं तर संस्कार नसणं, लोकांना फसवणं,लोकाना कमी लेखणं,एखाद्याला लुबाडणं,लाच खाणं,अश्लिल वर्तणूक करणं असे वर्तन असणाऱ्या साऱ्यांना चारित्र्यहीन या वर्गात मोडावं.पण तसं होताना दिसत नाही.
    खरं तर कुकर्म करणारे सारेच चारित्र्यहीन असतात.पण समाजात हा शब्द सर्रास केवळ स्त्रीसाठी वापरला जातो.जरा कुठे एखादी स्त्री अन्यायाचा सामना करू लागली, मनासारखं जगू लागली, मुक्त विचार मांडू लागली,पुरुषांशी मोकळेपणाने बोलू लागली की, लगेच तिला "चारित्र्यहीन" असं लेबल लावलं जातं.पण का? प्रेमात पडलेली मुलगी असेल किंवा आधार, प्रेम शोधणारी एखादी महिला असेल तर त्यांना लगेच दोषी ठरवून शिक्का मोर्तब केलं जातं.पण समाज विसरतो की,ज्याच्या प्रेमात ती पडते तो एक पुरुष असतो.आणि स्त्री आणि पुरुष यांच्यातील सहजीवनास मान्यता निसर्गाने दिली आहे.पण जेव्हा हे सहजीवन समाजमान्य चाकोरीत नसते तेव्हा अशी लेबलं लावली जातात.पण हे लेबलं दोघांनाही असतं.पण बळी जातो ते महिलांचा.पण का?
    खुपदा असं दिसतं की, प्रेमात पडणाऱ्या मुलींना आपण वाईट चालीची असं खुशाल म्हणतो.पण एखादा मुलगा अनेक मुलींना फसवतो किंवा तो प्रेमात पडतो तेव्हा तो वाईट चालीचा नसतो का? एकीकडे प्रेम म्हणजे ईश्र्वराचे रुप म्हणायचं आणि दुसरीकडे ते जोपासू पाहणाऱ्यांवर शिंतोडे उडवायचे.हा कुठला न्याय? प्रेमात पडायला मुलगी लागते पण नियम मात्र फक्त तिलाच लागू.वर्षानुवर्षे एक स्त्री या चारित्र्य नावाच्या चक्कीत पिसली जाते तरीही या समाजाला काहीच वाटू नये? स्त्री कधीच एकटी चारित्र्यहीन नसते.तिला तसं बनवणारा पुरुष,हा समाज तोही त्यात सामील असतोच की.पण तरीही एक चारित्र्यहीन पुरुष, चारित्र्यहीन समाज असं कोणी म्हणताना दिसतं नाही.पण एक स्त्री मात्र साऱ्यांना दिसते.जणू सर्व जगचं तीच्या वर्तनावर देखरेख करीत असतं.अरे पण ,ती देखील माणूस आहे.या समाजाचा तितकाच महत्त्वाचा घटक आहे.हे आपण का विसरतो? खरं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामुळेच ही पृथ्वी आहे.पण तरीही, सारं उमजूनही आजही एक स्त्री माणूस म्हणून जगताना दिसत नाही.......... खरं तर "चारित्र्य" या संस्कारात केवळ स्त्री आणि पुरुष यांचे समाज अमान्य नातंच येत नाही.माणुसकीशी संबंधित सारी नीतीमूल्ये यात येतात.पण तरीही केवळ एकाच गोष्टीवरून एखाद्या स्त्रीला चारित्र्यहीन का ठरवलं जातं?एखादी वेश्या पोटासाठी किंवा तिच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे ती ते काम करत असेल.पण तिच्यातही माणुसकी असते.ती ते काम करते म्हणून ती चारित्र्यहीन असू शकतं नाही.उलट ती पुरुषी कामवासना शमवून समाजाचं संरक्षण करीत असते.म्हणूनच एकाच दृष्टीकोनातून एखाद्या स्त्रीला चारित्र्यहीन ठरवू नये.एका स्त्रीला चारित्र्यहीन ठरवताना तो समाजही तितकाच दोषी असतो.मुळात मला चारित्र्यहीन ही संकल्पनाच पटत नाही.कारण या समाजातील सर्वच माणसं ही थोड्याफार प्रमाणात दुर्गुण असणारी असतातच.सर्वगुणसंपन्न असा कोणीच नसतो.......

सौ.सुधा पाटील

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मैत्री

🌹🌹🌹🌹 मैत्री 🌹🌹🌹🌹

        मैत्री असावी एकमेकांत गुंफलेली,
         जणू एकरुप असणारी,
        मैत्री असावी शीतल चंद्रासारखी
        सदैव प्रकाश बनून सोबत चालणारी,
        मैत्री असावी फुलांच्या गुच्छासारखी,
        सदैव एकत्र गुंफून आनंद देणारी,
       मैत्री असावी सदैव अल्लड आणि बाल,
       आपला प्रत्येक क्षण जादूमय करणारी
         खरंच जीवनात मैत्री असावी
        जीवनाला ही पुरून उरणारी
       अन् आयुष्य खट्याळ बनवणारी!

      मैत्री! शब्दांच्या पलीकडले जाऊन नात्याचा उत्सव करणारी! जगातलं एकमेव नातं जिथं कशालाच मर्यादा नसतात.चाकोरी सोडून मनमुराद आनंद जिथं लुटला जातो ते हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री! अगदी बालपणापासून मैत्री नावाचं रोपटं मनात रुजलं जातं.वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक मित्र भेटत जातात.सारेच त्या त्या वेळी आपला आधार बनतात.काही मित्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपले सोबती बनून राहतात.कधी कधी स्वार्थापोटी मैत्रीच्या नात्याला कलंकित करणारी माणसंही भेटतात.पण ती मित्र नसतातंच.जे मित्र असतात त्यांना मैत्रीची जाणीव असतेच.तिथं आपसूकच कर्तव्याची परिपूर्ती होतं असते.
     खरे मित्र तेच असतात जे वेळोवेळी तुमच्या चुका दाखवून तुम्हाला सावध करतात.आणि काही कौतुकास्पद असेल तर आनंदाने उत्सव साजरा करतात.जगातील साऱ्या नात्यांपेक्षा हृदयाच्या अत्यंत जवळ असणारं नातं म्हणजे मैत्री!कारण तिथं कोणतंच गुपीत गुपीत राहतं नाही.अशी ही मैत्री आयुष्याला संगीतमय करते.सुखाची बरसात करते.मैत्री म्हणजे जणू श्र्वास! संकटकाळी सोबत असणारी आस! म्हणूनच हे नातं जपायचं! मनात खोलवर रुजवून सजवायचं!
     मित्रांसोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय असतात.दंगामस्ती,आचरट विचरट भाषा, बेधुंद जगणं, एकमेकांच्या जखमांवर फुंकर मारणं, रडणं,हसवणं,एकमेकांची गुपितं जपणं, चेष्टा मस्करी,खाण्यात अर्धा वाटा हे सारं सारं फक्त मैत्रीतंच घडू शकतं.मैत्रीला वय नसतं.पण भावना असतात.विचारांची समान पातळी असते.जोपर्यंत हे सुंदर नातं या पृथ्वीवर आहे तोपर्यंत आनंदाचा खजिना इथे अमाप असेल.पावसाच्या सरींनी बेधुंद होऊन बरसावं तसंच मैत्रीचं नातं सदैव बरसतं असतं.मनाला उभारी देत असतं.इथ फायदा तोटा याची गणितं कधीच मांडली जात नाहीत.म्हणूनच ते ईश्र्वरी रुप आहे.
सौ.सुधा पाटील

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...