शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..

    बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्त्रीसाठी मैत्रिणच असते.त्यामुळेच तिचं आरोग्य उत्तम राहू शकत.तीला मातृत्व प्राप्त होतं.ही मासिक तिच्या जीवनात आल्यापासून जवळ जवळ तीस वर्षे आणि जितकी मुले झाली तितके महिने त्या तीस वर्षात मिळवून जितकी वर्षे होतात तितकी वर्षे मासिक पाळी एका बाईच्या आयुष्यात असते.त्यामुळे ती प्रत्येक महिलेची जीवाभावाची सखी असते.ती जीवनात असताना काही जणींना काही शारीरिक व मानसिक त्रास होतात.पण आपण आहार विहार याची नीट काळजी घेतली,स्वच्छतेची काळजी घेतली तर ती अगदी सहज आपल्या आयुष्यात राहते.याविषयी सविस्तर माहिती मी मागे चार भागांमध्ये लिहिली आहे.
    परंतु या सखीचा परतीचा काळही काही काही महिलांना त्रासदायक असू शकतो.पण काही काही महिलांच्या आयुष्यात ही सखी अगदी संथ नदीसारखी येते.आणि तितक्याच शांतपणे निघून जाते.रजोनिवृत्तीचा कालावधी साधारण तीन ते चार वर्षांचा असतो.म्हणजे एकदा हा सुरू झाला की तो तीन ते चार वर्षांनी संपतो.आणि मग ही मासिक सखी कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाते.पण सख्यांनो ती आयुष्यात असते तेव्हा आपणास ती कटकट वाटते.पण तीचं जाणं आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण करुन जातं.जणू आपलं स्त्रीत्व काहीस दुबळं पडतं.रजोनिवृत्ती म्हणजे काय?त्या काळात स्त्रियांना कोणत्या शारीरिक, मानसिक बदलांना सामोरे जावे लागते.याची माहिती करून घेतली कि, रजोनिवृत्तीला सहज स्विकारता येतं.आणि या काळात प्रत्येक बाई या बदलातून जातच असते.याची जाणिव झाली की मग त्रास कमी होतो.कारण या काळात मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं गरजेचं असतं.
रजोनिवृत्तित होणारे बदल......
*हा काळ सुरू झाल्यानंतर मासिक पाळी अवेळी येते.कधी ती दोन ते तीन महिन्यांनी येते किंवा महिन्यात दोनदा येते.अंगावरुन खूप जास्त जातं.तर कधी कधी खूपच कमी जातं.
*या काळात प्रजनन संस्थेच्या अवयवांच आकुंचन होत असतं.योनीतील ओलसरपणा कमी होतो.त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना महिलांना त्रास होतो.त्यातच महिलांची कामभावना कमी होत असते.रजोनिवृत्ती नंतर काही महिला कामजीवनाकडे दुर्लक्ष करु लागतात.त्यामुळे वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू होतात.यावर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन उपाय शोधावेत.
*काही महिलांना कॅल्शियम कमी झाल्याने कंबर दुखी,गुडगे दुखी,अंग दुखी, पोट दुखी, किंवा शरीराचा एखादा अवयव दुखणे अशा तक्रारी सुरू होऊ शकतात.पऱतु प्रत्येक महिलेची शरीर रचना भिन्न असल्यामुळे ही लक्षणें भिन्न असू शकतात.
*या काळात मानसिक बदल खूप होतात.कारण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्राॅन  ही महत्त्वाची संप्रेरके शरीरात स्त्रवायची बंद होतात त्यामुळे महिलांच्या शरीरात होणारे बदल स्विकारणे त्यांना कठिण जातं.वजन वाढतं.चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.केस गळतात.चिडचिड वाढते.कामात उत्साह राहतं नाही.काही महिलांना गालावर किंवा हनुवटीवर किंवा ओठांच्या वर मिशांसारखे केस येतात.म्हणूनच आपलं सौंदर्य आता कमी होणार ही भावना महिलांच्या मनात निर्माण होते.त्यामुळे त्या मनातून खचतात.
    परंतु वरील सर्व लक्षणे सर्वच महिलांमध्ये दिसतील असे नाही.उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणाऱ्या महिलांना रजोनिवृत्ती कधी संपली हेही समजत नाही.इतकी ती सहजपणे संपते.आपली रजोनिवृत्ती कधी सुरू होणार हे प्रत्येक महिलेने लक्षात घेऊन तशी काही लक्षणं जाणवू लागली तर ती सहजपणे स्विकारावीत.त्याचा बाऊ करु नये.आपला आहार संतुलित ठेवावा.दररोज थोडा व्यायाम करावा.याविषयी आपला जोडीदार, मुलं यांच्याशी स्पष्ट बोलून त्यांची कामात मदत घ्यावी.म्हणजे चिडचिड होणार नाही.आपले छंद जोपासून या काळात मन प्रसन्न ठेवावे.जाणिवपूर्वक आपण काळजी घेतली तर आपणास रजोनिवृत्तीचा त्रास कमी होईल.
   चला तर मग आपल्या सखीची पाठवणी हसत हसत करुया.स्वत:ला कणखर बनवूया.जीवनाचं सारं सुख मनावर असतं.म्हणूनच मनास प्रसन्न आणि चिरतरुण ठेवा.म्हणजे मग रजोनिवृत्ती नंतरचं आयुष्य सुंदर जगात येईल.प्रत्येक बाईला यातून जावं लागतच.त्यामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे समजून घेऊन आपण हा काळ सहजपणे हाताळू शकतो.त्यानंतरचा काळ पुन्हा नव्याने जगता येतो.तर मग आपल्या सखीचं आगमन तितक्या आनंदाने केलं तितक्याच आनंदाने तीची पाठवणी करून पुढील आयुष्य स्वत:चे छंद जोपासत आनंदाने जगूया.
.......शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
सौ.सुधा पाटील.

मनाच्या पत्रिका

#मनाच्या_पत्रिका
...........लग्नाचा मौसम सुरू झाला आहे.. वधूवरांच्या पत्रिका बघणं,किती गुण जुळतात हे बघणं...मग लग्न बांधायची का नाही याचा विचार करणं..
हे सारं सुरु झालं आहे.पण खरंच पत्रिका बघणं गरजेचं असतं का?आणि किती गुण जुळले तर लग्न बांधावी हे कोणी ठरवलं?ज्यांचे जास्तीत जास्त गुण जुळतात ते खरंच मनापासून एकत्र राहतात का? याचा देखील एक रिसर्च व्हावा आणि त्याची देखिल अनुमाने काढली जावीत असं मला वाटतं.😀...
कारण मी काही जणांकडून ऐकलं आहे.... छत्तीसच्या छत्तीस गुण जुळून एका जोडप्याचा घटस्फोट झाला.आणि ज्यांनी पत्रिकाच पाहिली नव्हती त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे.मुळात लग्न बंधनाने दोन भिन्न स्वभावाचे जीव, दोन भिन्न संस्कृतीत वाढलेले जीव एकत्र येऊन सहजीवनाची सुरुवात करीत असतात.त्यामुळे अर्थातच एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं किंवा त्यांच्या आड अडथळा न बनणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.मुळात मनाच्या पत्रिका जुळणं आधी महत्वाचे असते.पण काळ बदलला तरी त्या कोणी बघतंच नाही.आजकाल वाढलेल्या अपेक्षा, अजूनही जपली जाणारी पुरुष प्रधान संस्कृती यामुळे लग्न होणं अवघड...आणि झाली तरी ती टिकणं हल्ली अवघड होऊन बसले आहे....
मुळात कर्मकांडे करणं, मुहूर्त बघणं ,अशा गोष्टी मानसिक दुबळेपणा,भीती यापोटी केल्या जातात.खूपदा मनातली भीती, अविश्वास याला कुठेतरी स्थैर्य मिळाव यासाठी देखील काही गोष्टी केल्या जातात.थोडक्यात काय तर,एखादी गोष्ट घडणाऱ्या वेळीच घडणार असते, पण जर का कोणी त्याबद्दल काही भाकीत केलं तर माणूस तोवर मनाला शांत ठेवतो.हाही नकळत एक मानसिक स्थैर्याचा प्रकार म्हणायला हरकत नाही.पण त्यांच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.
असो... लग्न करताना,जर तरुण पिढी देखील पत्रिका बघणं पसंत करत असेल किंवा त्यावर विश्वास ठेवत असेल तर मात्र अजूनही विक्षान युग दूर आहे.अजूनही समाज अज्ञानी आहे असंच म्हणावं लागेल. पण जोपर्यंत मनाच्या पत्रिका जुळत नाहीत तोवर खऱ्या अर्थाने छत्तीस गुण जुळतंच नाहीत. कागदावरच्या गुणांपेक्षा स्वभावाचे गुण जुळून येण खूपच गरजेचे असते.
     एक काळ होता जेव्हा दिलेला शब्द पाळण्यासाठी,किंवा पाहुण्यातील आहे म्हणून लग्नं व्हायची. जास्त मुली होत्या त्या कुटुंबातील पालक लग्नं प्रकारची म्हणून जास्त काही न पाहता लग्नं करुन द्यायची.पण तेही संसार झाले...रेटले. पण तिथे कुठेही पत्रिका आड आली नाही. थोडक्यात काय तर...संसारासाठी दोन सक्षम मने लागतात. पण आज माणसं लग्न टिकण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टी न पाहता पत्रिका पाहतात आणि त्यावरच जास्त विश्वास ठेवतात. विज्ञान युगातही वेल एज्युकेटेड माणसंही केवळ पत्रिका जुळत नाही म्हणून सर्व बाजूंनी योग्य असणार स्थळ सोडत असतील तर अवघड,आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे? ...मग माझा समस्त वर्गाला एक प्रश्न आहे....स्थळ चांगलं नाही...पण पत्रिका शंभर टक्के जुळते अशा ठिकाणी लग्न जुळविले का?...अर्थात सर्वांच उत्तर नाही असंच असणार...
फक्त विचार करा....
लग्नं ही प्रेमावर...
समजुतीवर...आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या आदरावरच.....परिपक्व होत जातात...
लेखिका,समुपदेशक
सौ.सुधा पाटील

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...