# Life is not permanent...
अलीकडे वातावरण खूपच भयानक झालेलं आहे.कोरोनाचे वाढते आकडे,आपलाही यात नंबर लागेल की काय याची भीती,पुढे भविष्य काय असेल याच विवंचनेत मानव, जीव मुठीत घेऊन जगत आहे.खर तर मानवी मानसशास्त्र असं सांगतं की, तुम्ही जसा विचार करता तशीच लक्षणे तुमच्या शरीरात निर्माण होतात.खूपदा असं चित्र दिसून येत की, अगदी निरक्षर माणसं जीवनात खूप खंबीर असतात.आणि शिकलेली माणसं सारं कळतं असूनही वळत मात्र नाही याच मानसिकतेतून जगताना दिसतात.पण जगण्याचा तत्त्वज्ञान आणि शिक्षण याचा तसा काहीच संबंध नाही.ज्याला हे तत्त्वज्ञान समजतं आणि जगता येतं तो बिनधास्त मस्त आयुष्य जगून ही यात्रा संपवून जातो.
साऱ्या मानव प्राण्यांना हे माहिती आहे आपलं जीवन हे पर्मनंट नाही.जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळचं आहे.पण तरीही मरणाच्या भीतीने आधीच शंभर वेळा माणूस मरून जातो.पण जर मनात कसलीही भीती न बाळगता जेव्हा मृत्यू यायचा आहे तेव्हा तो येणारच आहे त्याची उगाचंच चिंता आज कशाला? मी माझा आज मस्त जगेन.अशी विचारसरणी मनात नित्य निर्माण केली जावी.मी असं नाही म्हणत की हे लगेच जमेल.कारण मानवाला आयुष्याची आसक्ती फार असते.माणूस आयुष्य सुंदर कसं करावं याच्या विचारांपेक्षा मरणाची भीती जास्त बाळगतो.आणि हे सुंदर आयुष्य असंच काळजी, विवंचना, हेवेदावे, अहंकार यातच संपवून टाकतो.पण ज्याला कळतं की, आपलं मन जसा विचार करेल तसंच आपल्या आयुष्यात घडेल,तो माणूस सदैव मनात चांगले विचार कसे राहतील याचा विचार करतो.खूप आयुष्य म्हणजे खरं जीवन नव्हेच.मिळालेल आयुष्य तुम्ही कसं जगता यावर त्या आयुष्याचं मोल ठरतं असतं.उद्याच्या मरणाचा विचार आज करत राहिलात तर एखादा किडा जसं लाकूड आतून पोखरून काढत राहतो तसा तो नकारात्मक विचार तुम्हाला आतून पोखरून काढतो.आणि हे तुम्हाला समजतही नाही.वेळ निघून जाते आणि माणूस मानसिक आजारांना बळी पडतो.म्हणूनच या जगात पैसा,नाती, आयुष्य काहीच स्थिर नसतं.म्हणूनच येणारे प्रसंग झेलत,त्यांना तोंड देत आनंदाने ही जीवन यात्रा संपवायची असते.किड्या मुंगीप्रमाणे जगायचं की,आजचा दिवस फक्त माझा असं समजून आनंदाने जगायच हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.वपुंच एक वाक्य आहे..."या अशाश्वत आयुष्यात सातत्याने माणसाला शाश्वत काहीतरी हवं असतं."
आणि याच नादात माणूस हे जगणंच विसरून जातो.सतत भीती, अपेक्षा,दुःख यांच्या दडपणाखाली माणूस जगत राहतो.पण न भीता समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे गेले की, आपोआपच लढण्याचं बळ निर्माण होतं.तुमच्या मानसिक शक्तींची तुम्हालाच जाणिव होऊ लागते.मुळातंच प्रत्येक माणसात प्रचंड मानसिक ताकद असते.पण ती सर्वांनाच वापरता येत नाही.पण ती शक्ती आपण स्वत:च शोधून काढायची असते.ती सापडली की,भीत भीत जगणं संपून जातं.भिऊन रोज मरण्यापेक्षा धैर्याने जगून एकदाच खरंखुरं मरावं.जीवन जर पर्मनंट नाही तर मग उगाचच त्याचा मोह तरी कशाला? याचा अर्थ जीवनाबद्दल प्रेम नसावं असा नाही.
कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली राहून आपल्याच शरीरात नकारात्मक उर्जा निर्माण करू नका.जेवढं आयुष्य वाट्याला येणार आहे तेवढ मी आनंदाने,सुखाने जगेन हीच भावना मनात सतत निर्माण करावी.आणि यासाठी प्रयत्न करावेच लागतात.मनात आलं म्हणून, एखादं प्रेरणादायी लेक्चर ऐकलं म्हणून लगेचच मन सकारात्मक होईल असं नाही.कारण ऐकलेले सुंदर विचार केवळ कानाला थडकून बाहेर जाऊ शकतात.म्हणूनच मनाला सकारात्मक ठेवणं, भयमुक्त जगणं यासाठी आपणंच प्रयत्न करावे लागतात.
सुधा पाटील सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा