# यशस्वी लग्न....
सहजीवनासाठी, प्रजोत्पादनासाठी किंवा सेक्सची नैसर्गिक भूक पूर्ण केली जावी म्हणून लग्न केलं जातं.यापेक्षा वेगळी कारणं कोणाची नसावीत.पण आपल्या समाजात जे लग्न शेवटपर्यंत टिकतं ते यशस्वी लग्न असं मानलं जातं.पण या यशस्वी लग्नांचा मागोवा घेतला तर खूपदा असं दिसून येतं की,ती लग्नं जाणीवपूर्वक टिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो.आणि अशीच तडजोडीने टिकवली जातात.समाजातील जुनी,अनुभवी लोकं म्हणतात,हल्ली लग्न म्हणजे खेळ झालाय.पण मी तर म्हणेन की,हल्ली हल्ली लग्नाचा खरा अर्थ समजू लागलाय.तडजोडीने लग्न टिकवणं म्हणजे मनात नसताना सामाजिक बंधनांमुळे एखाद्या तुरुंगात दोघांनीही स्वत:ला कोंडून घेणं.पण हे कितपत योग्य आहे?त्यापेक्षा हल्ली काहीजण लग्नाने आपण सुखी नाही किंवा एकमेकांसाठी परिपूर्ण नाही हे लक्षात आल्यावर एकमेकांना एकमेकांच्या विचाराने , समजुतीने वेगळे होतात.आणि यशस्वी आयुष्यासाठी हेच योग्य आहे असं मला वाटतं....
खरं तर यशस्वी लग्न म्हणजे काय?याची प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात.आम्ही आयुष्याची तीस वर्षे एकत्र घालवली.म्हणजे आमच्यासाठी ते यशस्वी लग्न असं अनेकांना वाटू शकतं.पण ज्या सहवासात प्रेम,आदर, आपुलकी,ओढ, काळजी वाढणाऱ्या वर्षांसोबत वाढतं जातं ते खरं यशस्वी लग्न! यात वाद असतील पण ते संवादाने सोडवले जातील, तक्रारी असतील पण त्या समजूतीने आणि प्रेमाने सोडवल्या जातील.पण यासाठी तसे दोन सहजीव एकत्र यावे लागतात.पण नेमकं इथंच घोड पेंड खात ना!कारण समाजात तक्रारी असणारी जोडपीच जास्त दिसतात.खूपदा समाजात घटस्फोट घेणं म्हणजे अपमानास्पद मानलं जातं.किंवा समाजात घटस्फोट घेणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं म्हणूनच तडजोड करून संसार टिकवले जातात.पण मला वाटतं की, त्यापेक्षा आपलं काय चुकतंय?आपण कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात याचा विचार उभयतांनी करुन संसार प्रेमाचा करता येऊ शकेल का?याचा विचार ज्याने त्याने करायचा.तसंही प्रेम समजायला आधी त्याग समजायला लागतो.आणि हे प्रेम दोन्ही बाजूने असावे लागते.तरच "यशस्वी लग्न" या व्याख्येत लग्नं समाविष्ट होऊ शकतात.मध्यम वयाची जोडपी आपलं प्रेम व्यक्त करताना देखील समाजाचा विचार करतात.पण प्रेम ही गोष्ट व्यक्त होण्यानेच वाढत जाते.पण हे खूप जणांना समजतंच नाही.नव्याचे नऊ झाले की, कित्येक संसार रटाळवाणे किंवा यांत्रिक बनत जातात.पण खऱ्या अर्थाने यशस्वी लग्न करायचे असेल तर..जसा प्रत्येक वर्षी निसर्ग नव्याने बहरत असतो अगदी तसंच नाती नित्य नव्याने बहरावी लागतात.त्यातील कृत्रिमता संपवून जाणीवपूर्वक ते नातं फुलवावं लागतं.पण असं न झाल्याने नात्यात कृत्रिमता नकळतच येत जाते आणि कालांतराने ते नातं ओझं वाटू लागतं.म्हणूनच आपलं नातं नित्य कसं बहरतं ठेवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.निसर्ग खऱ्या अर्थाने जगण्याचं तत्त्वज्ञान नेहमीच सांगत असतो पण ते आपणास कळूनही वळत नाही.आपण आजकाल पाहतो की, घटस्फोट,लिव्ह इन रिलेशनशिप याचं प्रमाण वाढत आहे.कारण या पिढीपुढे यशस्वी लग्नं याची उदाहरणे तशी कमीच आहेत.कित्येक मुलं मुली तर आपल्या पालकांची तडजोड पाहतच मोठी झालेली असतात.त्याचा नकळतच मुलांवर परिणाम होतो.त्याचे पडसाद त्यांच्या भावी जीवनावर उमटताना दिसतात....
माझ्या एका मैत्रिणीला मी प्रश्र्न विचारला... तिनं छान उत्तर दिलं..... जिथं आयुष्याच्या सायंकाळी देखील जोडीदार एकमेकांची प्रेमापोटी काळजी घेतात....त्यांची ओढ सदैव टवटवीत असते...ते लग्न खऱ्या अर्थाने यशस्वी लग्न!
खरं आहे...तेच खरं यशस्वी लग्न...!जरा इगो बाजूला ठेवला,एकमेकांच स्वातंत्र्य एकमेकांना जपता आलं, एकमेकांनी एकमेकांचा आदर केला.... एकमेकांच्या आवडीनिवडी जाणीवपूर्वक जपल्या, एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांना माणूस म्हणून वागणूक दिली तर "यशस्वी लग्न"बनवणं सोपं होतं.सामाजिक समस्यांच मूळ नेमकं कशात आहे हे ओळखून भावी पिढी पुन्हा त्याच समस्यांमध्ये अडकू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.नाहीतर पुन्हा पुन्हा तेच चक्र.... तीचं घुसमट...आणि तीचं नाईलाजास्तव होणारी तडजोड!
सौ सुधा पाटील