रजोनिवृत्ती..
बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्त्रीसाठी मैत्रिणच असते.त्यामुळेच तिचं आरोग्य उत्तम राहू शकत.तीला मातृत्व प्राप्त होतं.ही मासिक तिच्या जीवनात आल्यापासून जवळ जवळ तीस वर्षे आणि जितकी मुले झाली तितके महिने त्या तीस वर्षात मिळवून जितकी वर्षे होतात तितकी वर्षे मासिक पाळी एका बाईच्या आयुष्यात असते.त्यामुळे ती प्रत्येक महिलेची जीवाभावाची सखी असते.ती जीवनात असताना काही जणींना काही शारीरिक व मानसिक त्रास होतात.पण आपण आहार विहार याची नीट काळजी घेतली,स्वच्छतेची काळजी घेतली तर ती अगदी सहज आपल्या आयुष्यात राहते.याविषयी सविस्तर माहिती मी मागे चार भागांमध्ये लिहिली आहे.
परंतु या सखीचा परतीचा काळही काही काही महिलांना त्रासदायक असू शकतो.पण काही काही महिलांच्या आयुष्यात ही सखी अगदी संथ नदीसारखी येते.आणि तितक्याच शांतपणे निघून जाते.रजोनिवृत्तीचा कालावधी साधारण तीन ते चार वर्षांचा असतो.म्हणजे एकदा हा सुरू झाला की तो तीन ते चार वर्षांनी संपतो.आणि मग ही मासिक सखी कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाते.पण सख्यांनो ती आयुष्यात असते तेव्हा आपणास ती कटकट वाटते.पण तीचं जाणं आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण करुन जातं.जणू आपलं स्त्रीत्व काहीस दुबळं पडतं.रजोनिवृत्ती म्हणजे काय?त्या काळात स्त्रियांना कोणत्या शारीरिक, मानसिक बदलांना सामोरे जावे लागते.याची माहिती करून घेतली कि, रजोनिवृत्तीला सहज स्विकारता येतं.आणि या काळात प्रत्येक बाई या बदलातून जातच असते.याची जाणिव झाली की मग त्रास कमी होतो.कारण या काळात मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं गरजेचं असतं.
रजोनिवृत्तित होणारे बदल......
*हा काळ सुरू झाल्यानंतर मासिक पाळी अवेळी येते.कधी ती दोन ते तीन महिन्यांनी येते किंवा महिन्यात दोनदा येते.अंगावरुन खूप जास्त जातं.तर कधी कधी खूपच कमी जातं.
*या काळात प्रजनन संस्थेच्या अवयवांच आकुंचन होत असतं.योनीतील ओलसरपणा कमी होतो.त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना महिलांना त्रास होतो.त्यातच महिलांची कामभावना कमी होत असते.रजोनिवृत्ती नंतर काही महिला कामजीवनाकडे दुर्लक्ष करु लागतात.त्यामुळे वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू होतात.यावर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन उपाय शोधावेत.
*काही महिलांना कॅल्शियम कमी झाल्याने कंबर दुखी,गुडगे दुखी,अंग दुखी, पोट दुखी, किंवा शरीराचा एखादा अवयव दुखणे अशा तक्रारी सुरू होऊ शकतात.पऱतु प्रत्येक महिलेची शरीर रचना भिन्न असल्यामुळे ही लक्षणें भिन्न असू शकतात.
*या काळात मानसिक बदल खूप होतात.कारण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्राॅन ही महत्त्वाची संप्रेरके शरीरात स्त्रवायची बंद होतात त्यामुळे महिलांच्या शरीरात होणारे बदल स्विकारणे त्यांना कठिण जातं.वजन वाढतं.चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.केस गळतात.चिडचिड वाढते.कामात उत्साह राहतं नाही.काही महिलांना गालावर किंवा हनुवटीवर किंवा ओठांच्या वर मिशांसारखे केस येतात.म्हणूनच आपलं सौंदर्य आता कमी होणार ही भावना महिलांच्या मनात निर्माण होते.त्यामुळे त्या मनातून खचतात.
परंतु वरील सर्व लक्षणे सर्वच महिलांमध्ये दिसतील असे नाही.उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणाऱ्या महिलांना रजोनिवृत्ती कधी संपली हेही समजत नाही.इतकी ती सहजपणे संपते.आपली रजोनिवृत्ती कधी सुरू होणार हे प्रत्येक महिलेने लक्षात घेऊन तशी काही लक्षणं जाणवू लागली तर ती सहजपणे स्विकारावीत.त्याचा बाऊ करु नये.आपला आहार संतुलित ठेवावा.दररोज थोडा व्यायाम करावा.याविषयी आपला जोडीदार, मुलं यांच्याशी स्पष्ट बोलून त्यांची कामात मदत घ्यावी.म्हणजे चिडचिड होणार नाही.आपले छंद जोपासून या काळात मन प्रसन्न ठेवावे.जाणिवपूर्वक आपण काळजी घेतली तर आपणास रजोनिवृत्तीचा त्रास कमी होईल.
चला तर मग आपल्या सखीची पाठवणी हसत हसत करुया.स्वत:ला कणखर बनवूया.जीवनाचं सारं सुख मनावर असतं.म्हणूनच मनास प्रसन्न आणि चिरतरुण ठेवा.म्हणजे मग रजोनिवृत्ती नंतरचं आयुष्य सुंदर जगात येईल.प्रत्येक बाईला यातून जावं लागतच.त्यामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे समजून घेऊन आपण हा काळ सहजपणे हाताळू शकतो.त्यानंतरचा काळ पुन्हा नव्याने जगता येतो.तर मग आपल्या सखीचं आगमन तितक्या आनंदाने केलं तितक्याच आनंदाने तीची पाठवणी करून पुढील आयुष्य स्वत:चे छंद जोपासत आनंदाने जगूया.
.......शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
सौ.सुधा पाटील.