*लग्न आणि सेक्स*भाग 1
समाजात फक्त दोनच प्रमुख जाती आहेत.एक स्त्री आणि दुसरी पुरुष.या दोघांच्या समागमातून पुढची पिढी तयार होत असते.तयार होणाऱ्या पिढीची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांच पालनपोषण व्हाव यासाठीच तर लग्न ही संस्था निर्माण झाली आहे.लग्न म्हणजे दोन मनांच मीलन! दोन जीव एकरुप होणं!अशा अनेक व्याख्या केल्या जातात.पण त्या केवळ साहित्यिक विश्वातच ऐकायला छान वाटतात.खरं तर वास्तव फार भयानक असतं.लग्न म्हणजे केवळ सेक्स साठी समाजानं दिलेला परवाना असतो. त्यामुळे कुठेतरी एक मर्यादा घातल्या जातात.परंतू खरा विचार केला तर अनेक लग्नं ही नंतर नंतर केवळ तडजोड बनतात.कारण जशा इतर मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स ही देखील मानवी जीवनास अत्यावश्यक अशी गरज आहे.परंतू नव्याचे नऊ दिवस झाले की नवरा बायको सेक्सकडे तितक्याशा गांभिर्याने पाहत नाहीत. आयुष्यात सेक्स ही मरेपर्यंत मानवाला हवी असणारी गरज आहे हेच ते विसरतात आणि मग संघर्ष सुरू होतो.खरं तर सेक्सला संभोग असं म्हणतात.याचा अर्थच समान भोग घेणं, समान आनंद घेणं असा आहे.परंतू यात स्त्री ही केवळ एक भोग वस्तु, मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषाच्या वीर्यस्खलनाच साधन या भावनेनेचं तिच्याकडे पाहिले जाते.किंबहूना तसेच संस्कार तिच्यावर लहानपणापासून केले जातात.त्यामुळे खुपदा बरचसं सेक्स विषयीची माहिती असूनही महिला गप्प बसतात.कारण तिच्यावर खुप तयारीची आहे,आधी अनुभव घेतला असेल असे टोमणे बसू नयेत असं तीला वाटतं.त्यामुळे बऱ्याच महिला मूल झाल्यावर त्याच्या संगोपनात स्वत:ला वाहून घेतात.खुपदा अति घरकाम, बाळाचं संगोपन यामुळे तिला सेक्सची भावना उरतच नाही.अशा वेळी पुरुष तिला समजून न घेता दोष देत राहतो.आणि तिथेच त्यांच्यात अंतर पडत जातं
खरं तर अशावेळी पुरुष वर्गाने तिला सहकार्य करून तिच्यातील संवेदना जीवंत ठेवली पाहिजे.दोघांच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.कारण आरोग्य उत्तम असेल तरच उत्तम व आनंदी सेक्स लाईफ जगता येतं.स्त्रीवर्ग सतत कामात मग्न असल्याने सेक्सचा आनंद त्या घेऊच शकतं नाहीत.किंवा खूप जणींना खरा सेक्स काय हे माहितही नसतं.पुरुष वर्गही आपल्या बायकोलाही सेक्सचा आनंद घेता यावा याचा विचार करीतच नाही.केवळ यांत्रिकरित्या सेक्स उरकला जातो.यात भावना नसतातच.त्यामुळेच लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एका घरातही अनोळखी असल्याप्रमाणे राहतात.त्यांच नातं जणू यांत्रिक बनतं जातं.खरं तर प्रेम बळकट करण्याचा उत्तम मार्ग सेक्स असतो.विज्ञान हेच सांगते की, सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळेच आनंदी जीवन जगता येतं.अनेक ताणतणाव हे सेक्स मुळे कमी होतात.हे सारं खरं असलं तरी,याची जाणीव किती जणांना आहे? कितीजण याचा विचार करून आपलं सेक्स लाईफ हेल्दी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? हेही विचारात घ्याव लागेल.त्यात सेक्स बाबत महिलांना जागृत करणेही खूप गरजेचे आहे.कारण सेक्स या क्रियेत दोघांचा क्रियाशील सहभाग महत्त्वाचा असतो.आणि आजही याविषयी प्रचंड अज्ञान आहे.
अरे जर स्त्री वर्गच याविषयी अज्ञानी राहिला तर मग ती नवऱ्याला साथ तरी कशी देणार?आज लग्न हे अरेंज असो किंवा लव्ह ते तेव्हाच नीट टिकू शकत जेव्हा तिथं सेक्स लाईफ हेल्दी असतं.नाहीतर मग केवळ ओढून ताणून तडजोड! मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करत असताना मला लक्षात आलं की, मुलं झाल्यानंतर महिला सेक्सला फार महत्त्व देत नाहीत.किंवा कामाचा ताण यामुळे त्यांची ईच्छाच राहतं नाही.त.यामळे संघर्ष वाढत जातात.नातं कोरडं बनतं जातं.अशावेळी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन यावर मार्ग काढला पाहिजे.त्यासाठी आधी सेक्स या विषयाची सखोल माहिती दोघांनाही असणं आवश्यक आहे.म्हणूनच निदान भावी पिढीला तरी याचं मार्गदर्शन करून लग्न ही संस्था बळकट केली पाहिजे.नाहीतर विवाहबाह्य संबंध वाढतच जाणार.कारण भूक लागली की माणूस जेवणं शोधतोच!हे अगदी नैसर्गिक आहे.मग तिथे स्त्री असो किंवा पुरुष!
महिलांशी चर्चा करताना जाणवलं की, पुरुष वर्ग महिलांना केवळ भोगवस्तू याप्रमाणे वागणूक देतो.तीचा आदर केला जात नाही.पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे तिला केवळ गृहितचं धरले जाते.तिच्यावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार केले जातात.अशा ठिकाणी त्या नात्यात मानसिक जवळिकता राहतं नाही.त्यामुळे अशा स्त्रिया नवऱ्याशी संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात.नवऱ्याचा अनिच्छेने केलेला संभोग त्यांना बलात्कार वाटतो.तरीही पर्याय नसल्याचे बायका गप्प बसतात.अशी नाती शेवटपर्यंत तणावाखाली जगतात.आणि संपून जातात.यामुळेच अनेक महिला मनोरुग्ण बनत आहेत.यासाठी वेळीच जागृती गरजेची आहे.किमान यापुढचा समाज तरी आपण जागृत बनवू शकतो.
सेक्सचा खरा आनंद तेच घेऊ शकतात ज्यांची मनं एकरुप होतात.कारण सेक्स शरीरांचा नसतोच.तो दोन मनांचा असतो.मनं सुंदर रित्या एकरुप झाली तरचं दोन शरीरं एकरुप होऊन संभोग करू शकतात.पण आपल्या समाजात सेक्स आणि लग्न यांचा संबंध केवळ मूलं जन्माला घालणं इतकाच आहे.जोवर ही विचार सरणी बदलत नाही तोपर्यंत समाजात अनेक गैरसमज पसरतं जाणार.म्हणूनच सेक्स आणि जीवन याचा सहसंबंध मानवास वेळीच सांगायला हवा.भविष्यात विचारी, निरोगी लग्नसंस्था निर्माण करायची असेल तर तरूण पिढीला आधी सेक्स विषयी ज्ञान दिले पाहिजे.सेक्स हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा अधिकार आहे.निरोगी, आनंदी मानवी जीवनाचा सेक्स हा महत्त्वाचा घटक आहे.म्हणूनच वेळीच हा विषय मोकळेपणाने समाजापुढे मांडूया.तरच समाज सुसंस्कृत बनू शकतो.
*सौ.सुधा पाटील सांगली*8459730502
लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
*लग्न आणि सेक्स*भाग2
या विषयावर कालच थोडं लिहिलं.बऱ्याच जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.खर तर हा विषयाचं गहन आणि सखोल आहे.त्यावर विचार मांडावेत तितके कमीच आहेत.पण आज भाग दोन मध्ये अजून थोडे विचार मांडण्याचा हा प्रयत्न!
कालचा लेख वाचून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने मला दोन याबाबतची सत्य उदाहरणे सांगितली.ज्यांची ती स्वत: साक्षीदार आहे.पहिलं उदाहरण एका मुलीचं..ती मुलगी लग्न झाल्यावर माझ्या मैत्रिणीला भेटली पण नववधूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हताच.तीनं चौकशी केल्यावर ती मुलगी म्हणाली, लहानपणापासून सेक्स म्हणजे घाण, वाईट असंच मला सांगितलं गेलं आणि लग्न झाल्यावर हेच घाण करायचं.मला किळस वाटते.मला त्यात इंटरेस्ट नाही.आता दुसरं उदाहरण...एक मुलगा त्याच्या आई व नववधूला घेऊन तपासायला माझ्या डॉक्टर मैत्रिणीनीकडे आला.तक्रार अशी की,ती नववधू नवऱ्याजवळ झोपायला तयार नाही.चौकशीअंती ती मुलगी म्हणाली, मला भीती वाटते.ते सगळं घाण वाटतं.असं म्हणून ती मुलगी रडायला लागली.कशीतरी समजून सांगून,तिला थोडा वेळ द्या असं तिच्या नवऱ्याला व सासूला समजावून पाठवलं.जाताना ते दोघे त्या नववधूला ओरडतच होते.पण दुसऱ्या दिवशी समजलं की,त्या मुलीनं आत्महत्या केली.खरचं धक्का बसला ही उदाहरणे ऐकून!
खरंच विचार करायला हवा.मी लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं.असचं कोणाच्यातरी तोंडून.... मुलं ही आई-वडीलांच्या वासनेतून जन्माला येतात.तेव्हा काहीच कळलं नाही.पण ते वाक्य मनावर कोरलं गेलं होतं.मोठेपणी अर्थ समजायला लागल्यावर हेच वाक्य मी मैत्रिणींमध्ये खुपदा चर्चेला घेतलं.पण अशीच वरवरची चर्चा झाली.मागेच या विषयावर लिहावं वाटलं पण तोच सामाजिक पगडा आणि भीती! आणि तेव्हा लेखणी अजून धारदार आणि धाडसी नव्हतीच.पण एकविसाव्या शतकात आम्ही खूप शिकलो.पण आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवता नाही आल्या.पण समस्येचं मूळ शोधल्याशिवाय समस्या कधीच संपत नाहीत.एखाद्या मुरलेल्या रोगासारखी ही दबलेली समस्या सतत डोकं वर काढत राहते.म्हणूनच योग्य वेळी योग्य ती काळजी आजार होऊच नये म्हणून घ्यायची असते.
खरंच प्रेमापोटी अपत्ये जन्माला येतं असती तर आज मुलींचे गर्भ पाडले गेले नसते.कचरा कुंडीत कोवळे अंकुर सापडले नसते.अनौरस बालके अशी लेबलं काही मुलांवर दिसलीच नसती.अनाथाश्रमे ओस पडली असती.असो...ही पण एक भयानक सामाजिक समस्या आहेच.
सेक्स लाईफचा नैतिक मार्ग म्हणून आपण या लग्न संस्थेकडे पाहतो.पण या संस्थेच्या दुबळेपणामुळे पाश्र्चात्य संस्कृती बोकाळत आहे.अनेक तरुण पिढीला लग्न नकोच आहे.लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृती बोकाळत आहे.पण का?याचा कुठेतरी विचार करायला हवा.एकीकडे आम्ही मुलींना सेक्स घाण असतो, वाईट असतो असे संस्कार करतो.आणि लग्न झालं की, फुलांनी सजवलेल्या पलंगावर तिला तेच करायची ही सुरुवात असं सांगतो.किती हा विरोधाभास!या अज्ञानामुळे कितीतरी कळ्या कोमेजून गेल्या असतील! कित्येक जीव आधी घुसमट सहन करून नंतर पर्याय नाही म्हणून परिस्थितीला शरणही गेले असतील.काळाच्या भयानक गर्तेत असंख्य कहाण्या लपल्या असतील.पण या विज्ञान युगात पुन्हा अशा कहाण्या तयार होऊ नयेत म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे.कारण आपणही या समाजाचे जागरूक घटक आहे.म्हणूनचं विवाह संस्था बळकट करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला विवाहपूर्व समुपदेशन करायलाच हवं.पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या बाईला आधार नसल्याने लग्नं टिकवली जायची.पण आज काळ बदलला आहे.मुलंमुली क्षणात घटस्फोट घेतात.यातूनही झालेल्या मुलांचे प्रश्र्न, त्यांच्या मनावर होणारा परिणाम या पुढच्या समस्या आहेतच.
या सर्व सामाजिक समस्या येऊच नयेत यासाठी लग्न म्हणजे काय? सेक्स म्हणजे काय?याची माहिती मुलामुलींना द्यायलाच हवी.तरच बलात्कार, अनैसर्गिक सेक्स अशा समस्यांना आळा बसेल.आमच्या मुलींना सुहागरात म्हणजे सजवलेला पलंग, मस्त नटणं सजणं म्हणजेच लग्न असं वाटतं.आजकालच्या मुलामुलींना सोशल मिडियामुळे बरीच माहिती मिळते.पण तीही अर्धवट आणि चोरून त्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होतात.म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशन करणाऱ्या संस्था बळकट करायला हव्यात.आमच्यावेळी असं कुठे काय होतं?असे फालतू प्रश्न उभा करण्यात काहीच अर्थ नाही.आपली पिढी अज्ञानातच वाढली.वाढत आहे, सेक्स ही एक नैसर्गिक गरज असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे त्यातील समस्या गाढायच्या! यातूनच समस्या वाढत जातात आणि कधीही न सुटणारा गुंता तयार होतो.आजची पिढी तडजोड करून संसार टिकवणारी नाही.मुली स्वावलंबी झाल्या आहेत.पूर्वी बाईला जगण्यासाठी माहेर किंवा सासर हाच आधार होता.बाईची वाईट अवस्था ही की,दिल्या घरीच मर!सर्व चांगलं असलं तर ठिक नाहीतर बाई मरायचीच! वाईट वाटतं की,जन्मदाते सुद्धा त्रास सहन कर पण तिथेच मर असं मुलीला म्हणायचे.आजही काहीजण तसंच म्हणतात.कारण आपली सामाजिक परिस्थिती, सामाजिक संस्कार.पण जीवांशी खेळणारे संस्कार काय कामाचे?पण आज तशी परिस्थिती नाही.स्वत:च्या बायकोला छळणारा पुरुषही माझ्या मुलीला जपणारा जावई हवा असं म्हणतोच.हे वास्तव आहे.आणि म्हणूनच लग्न या संस्थेचा पायाच असणाऱ्या सेक्सची शास्त्रशुद्ध़ माहिती सर्व वयोगटातील मानव जातीला दिलीच पाहिजे.अगदी प्रेमात अखंड बुडालेली,एक दुजे के लिये असं म्हणणारी मुलं-मुली देखील सेक्स लाईफ असमाधानी असेल तर घटस्फोट घेतात.मग प्रेम गेलं कुठे? खरंच जरा वास्तव समजून घेऊया.भूक असह्य झाली की अगदी सभ्य माणूसही मागून किंवा चोरून खातोच! समाजात अनेक चोर निर्माण होतात ते केवळ गरचा अपुऱ्या राहतात म्हणूनच.कोणीही मानव मूळचा चोर नसतोच.अशा अनेक समस्या संपवायच्या असतील तर सेक्स हा विषय मोकळेपणाने समाजापुढे बोलून निकोप समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे.आणि मुख्य म्हणजे स्त्रीयांना यांत गौण समजणं म्हणजे मुर्खपणाचा कळस होईल.कारण आजकाल मुली महिलांवरील अत्याचार पाहून लग्नंच नको म्हणत आहेत.अस झालं तर काय होईल याचा विचार करा.सारीत तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप या संस्कृतीचा विचार करू लागली तर समाज किती धोक्यात येईल? यासाठीच स्त्री आणि पुरुष यांच्या उत्तम समायोजनाशिवाय उत्तम लग्न संस्था निर्माण होऊच शकत नाही.म्हणूनच सारासार विचार करून आपणच आपला समस्या सोडवून एक विचारशील समाज निर्माण करूया.
हा विषय नाजूक समजून अनेक समस्या दाबल्या जातात.यातूनच अनेक मनोविकृतींचा जन्म होतो आहे.आणिआपल्या समाजात मानसिक आरोग्य, मानसिक आजार याकडे दुर्लक्ष केलं जातं.कुटुंबात अनेक मानसिक आजार हे सेक्स मधील असमाधान हेच आहे.त्यात महिला वर्ग तर तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सहन करतो.सेक्स ही ओरबाडून खायची गोष्ट नाहीच.खरं वैवाहिक आयुष्य सुंदर करायचं असेल तर नवरा बायको दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या गरजा पूर्ण करायला हव्यात.एकीकडे बाई म्हणून तिचा अपमान करायचा आणि दुसरीकडे तिनं रात्री सारं विसरून पुरुषाला खुश करायचं अशी विचारसरणी असेल तर...अशक्य!कारण सेक्स हा मनांचा असतो.शरीर हे केवळ एक माध्यम असतं.म्हणूनच प्रेमाला, भावनांच्या ओलाव्याला महत्त्व आहे.हे ज्यांना कळतं त्यांचेच संसार एक दुजे के लिये बनतात.अन्यथा केवळ सामाजिक तडजोडी! आणि तडजोड म्हंटले की तिथं व्रण,यातना,असाह्यता आलीच.तिथं कुठे असणार प्रेमाचा अंकुर! म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला वेळीच आपण सावरूया.
सौ.सुधा पाटील सांगली
8459730502
# लग्न आणि सेक्स भाग 3#
गेल्याच वर्षी लॉकडाऊनच्या काळात"लग्न आणि सेक्स"या विषयावर दोन भाग लिहिले.ते दोन्ही भाग खूपच व्हायरल झाले.महाराष्ट्रातील अनेक भागांतून फोन आले.वॉट्सअॅपवर कमेंट्स आल्या.यावरून एक लक्षात आलं की,या विषयी अजूनही खूप अज्ञान आहे.यावर स्पष्ट बोलणं म्हणजे जणू एक अपराधंच! अशीच विचारसरणी दिसून येते.त्यातही एका बाईने यावर उघड उघड बोलणं म्हणजे फार मोठा सामाजिक अपराधच! पण याच एका गोष्टीभोवती दुनिया फिरताना दिसते.यातील असमाधानामुळे कित्येक जोडप्यांमध्ये संघर्ष दिसून येतो.तरीही मनातल्या मनात कित्येक प्रकरणे दडपली जातात.याची परिणिती मानसिक आजारात होताना दिसते.किंवा नवरा बायको यांच्या मधील नातं संपुष्टात येतं.किंवा कोरडं बनतं जातं.अशा समस्या निर्माण झाल्या तर नेमकं काय करावं? कोणाला विचारावं? कसं विचारावं? यातंच माणूस अडकून पडतो.पण अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे.यावर न लाजता स्पष्ट बोलून समस्या सोडवण्याची गरज आहे.
"लग्ध आणि सेक्स" भाग १व२ वाचून माझ्या महिला भगिनींनी अनेक समस्या सांगितल्या.आणि भाग तीन लिहावा अशी विनंती केली.म्हणूनच हा पुढचा एक प्रयत्न....बदलाची सुरुवात व्हावी म्हणून.... तत्पूर्वी एक समुपदेशक म्हणून माझ्याकडे काही समस्या आल्या होत्या.ते आधी थोडक्यात नमूद करते....
1) मॅडम आमच्या लग्नाला सहाच महीने झाले.बायको आणि मी नोकरी निमित्त लांब राहतो.सुट्टिदिवशी एकत्र येतो.पण त्या दिवशी बायको दमलेली असते.हवा तसा प्रतिसाद देत नाही.
2) मॅडम,आम्हा दोघांमध्ये सतत भांडणे होतात.त्यामुळे आमच्या मनात एकमेकांबद्दल मनात राग असतो.त्याचा परिणाम सेक्स लाईफवरती होतो.
3) मला नवऱ्याचा स्पर्श नकोसा वाटतो.कारण तो कधीही प्रेमाने वागत नाही.
4) बायको मला तुम्हाला सेक्स शिवाय दुसरं काही सुचतंच नाही.तुमची सवय घाणेरडी आहे.अस सतत म्हणते.
5) मेनोपॉजमुळे योनीमार्ग कोरडा पडतो.त्यामुळे सेक्ससाठी मनाची तयारीच नसते.पण नवरा संशय घेतो.भा़डतो.आमच्यात महिनोमहिने अबोला राहतो.अलिकडेच आमचं नातं खूप कोरड झालंय.
6) मुलं मोठी झाली आता ....सुना आल्या आता..... काय तुम्हाला आता म्हातारचळ लागलंय...अशा कमेंट्स बायको सतत करते.मग मला नैराश्य येतं.
7) माझा नवरा सेक्स बाबतीत खूपच अडाणी होता.त्याला काही सांगायला गेलं की, तुला इतकं कसं माहित?तु चारसोबीस बाई आहेस असं म्हणायचा.सततच्या भांडणाने आमचा घटस्फोट झाला.
वरील काही समस्या नमुन्यादाखल मांडल्या आहेत.त्या थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला जाणवत असतील.किंवा याही पेक्षा वेगळ्या समस्या इतरांच्या असतील.पण मी भाग एक मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, "सेक्स हा दोन मनांचाच असतो." जेव्हा दोन मनं संमतीने एकत्र येतात,त्याच्यात सामंजस्य निर्माण होतं, एकमेकांबद्दल प्रेम,आदर असतो तेव्हाच सेक्स फुलतो.अन्यथा बाकी साऱ्या समस्या आणि....एक प्रकारचा भयानक बलात्कार.....!
हा विषय तसा खूपच नाजूक असतो.जेव्हा नवरा बायको यांच्यामध्ये मोकळेपणाने संवाद होतो तेव्हा अशा समस्या दोघे मिळून सोडवू शकतात.खूपदा बायकांच्या डोक्यात नवऱ्याने दिलेला त्रास सतत घोळत असतो.त्या मनाने दुखावल्या जातात.अशा परिस्थितीत नवरा जेव्हा सेक्सची अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्या मनापासून प्रतिसाद देऊ शकतं नाहीत.त्यांची मानसिक तयारी नसल्याने त्यांचं शरीर हवा तसा प्रतिसाद देऊ शकतं नाही.म्हणूनच तुमचं सेक्सुअल लाईफ हे तुमच्या मानसिक नात्यावर आधारित असतं.खर तर सेक्स ही स्त्री आणि पुरूष यांची मूलभूत नैसर्गिक गरज आहे.या भावना दबल्या गेल्या की, अनेक मानसिक विकृती निर्माण होतात.उतार वयात माणसे विचित्र वागू लागतात.बलात्कार सारखे भयानक सामाजिक गुन्हे घडतात.माणूस नैराश्यात जातो.कित्येक विवाह संबंध घटस्फोटापर्यंत जातात.वयाच्या चाळीशी नंतर महिलांचा मेनोपॉज, शारिरीक तक्रारी,लाज,अज्ञान यामुळे देखील दांपत्यात सेक्स वरून संघर्ष निर्माण होतात.बऱ्याच महिलांचा असा समज असतो की,मेनोपॉज नंतर सेक्स करायचाच नसतो.किंवा तसा समज नसला तरी महिलांना ते नकोसं वाटतं.याची कारणं प्रत्येकीची वेगवेगळी असतात.पण काहीही असो लग्न ही संस्थाच सेक्सच्या पायावर उभारलेली असते.म्हणूनच दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या सामोपचाराने सोडवणं गरजेचं असतं.उतार वयात नवरा आणि बायको हेच एकमेकांचा आधार असतात.परंतू सुरवातीच्या काळात दोघांनी एकमेकांना समजून घेतलं नाही,एकमेकांचा आदर केला नाही, एकमेकांना हवा तो स्पेस दिला नाही, एकमेकांना वेळ दिला नाही,तर त्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफ वरती होतो.मनामध्ये दरी पडत जाते.म्हणूनच तुमचं सेक्स लाईफ सुंदर बनवायचं असेल तर सेक्स विषयीचं अज्ञान दूर करा.त्याविषयीची सविस्तर शास्त्रशुद्ध माहिती घ्या.न लाजता आपल्या पार्टनरला आपल्या अपेक्षा सांगा.आणि हो....यात स्त्री आणि पुरूष असा भेद करू नका.कारण या क्रियेत दोघांचा सहभाग महत्त्वाचा असतो.तरच खरा आनंद घेता येतो.यामध्ये दोघापैकी एकजण जरी अज्ञानी असेल तर संघर्ष हा अटळ असतो.
म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष दोघांनी मिळून सहजीवन सुंदर बनवायचं असतं हे समजून घ्यावं.आणि हे सहजीवन सेक्सुअल लाईफ चांगलं असेल तरंच सुंदर बनू शकतं.काही समस्या असतील तर न भांडता दोघे मिळून सोडवू शकतात.कारण या जगात एकही अशी समस्या नाही की जी सुटू शकणार नाही.महिलांनी देखील न लाजता आपल्या पार्टनरला काय हवं याचा विचार करावा.आणि पुरुषांनी हे लक्षात घ्यावं की, बायकोचं मन नाराज करून सेक्स लाईफ हवं तसं कधीच होतं नाही.हा एक समतोल आहे.ज्याची जबाबदारी दोघांच्या खांद्यावर असते.ही गरज पोटाच्या भुकेइतकीच महत्त्वाची असते.जे कपल यात समाधानी असतात तेच हे आयुष्य सुंदर बनवून जगतात.अज्ञानामुळे देखील खूप चुका होतात.काय हवं, काय करायला हवं हेच खूप जनांना समजतं नाही.म्हणूनच मानवी जीवनाचा पाया असणारा "सेक्स" समजून घेऊन संघर्ष टाळता येतो.
शेवटी विचार ज्याचा त्याचा.... just think....
समुपदेशक....सौ.सुधा पाटील
# लग्न आणि सेक्स भाग..4
लग्न आणि सेक्स या विषयाचे तीन भाग यापूर्वी लिहिले आहेत.मला वाटलं की,इतकी माहिती लोकांना या विषयावर विचार करण्यासाठी योग्य आहे.शेवटी हा एक नाजूक आणि मोकळेपणाने बोलण्याचा विषय नाही असंच मत आजही खूप जणांचं आहे.त्यात या विषयावर एका बाईने तर अजिबात बोलायचं नाही.जणू हा अलिखित नियमच आहे.पण तरीही या विषयाची समाजात जागृती व्हावी, समाजातील बलात्कार ही समस्या कमी व्हावी,याविषयीचं अज्ञान दूर व्हावं,याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत याचसाठी या लेखाचे भाग लिहिले.हा भाग चार लिहिण्याच कारण असं की.....* परवा एका बाईचा फोन आला.ती म्हणाली की,तुमचे तीनही लेख वाचले.छान आहेत.काळाची गरज आहे.पण तुम्ही अजून एक मुद्दा मांडला नाही. कोणता बरं?....ताई माझा नवरा खूप अस्वच्छ आहे.त्याची शारीरिक स्वच्छता नसते.त्यामुळे मला त्यांच्या जवळही जावू वाटत नाही.प्रतिसाद नाही दिला की,संशय घेतो.वादावादी होते.मला खरंच घटस्फोट घ्यावासा वाटत आहे.मी तिला म्हणाले,अग स्वच्छतेविषयी तु त्याला सांगायचंस ना!...त्यावर ती म्हणाली, अहो खूप सांगितले.पण ऐकत नाही.आणि म्हणतो याचा आणि स्वच्छतेचा काय संबंध?
दुसरं एक फोन......ताई, माझ्या नवऱ्याच्या अस्वच्छतेमुळे मला वारंवार इन्फेक्शन होतं.डॉक्टरांनी याविषयी त्याला माहिती सांगितली आहे.पण तरीही तो ऐकत नाही.
वाचकहो.... वरील दोन उदाहरणे ही काल्पनिक नाहीत.असे अनुभव अनेक जोडप्यांना येत असतील.खर तर वैयक्तिक स्वच्छता ही प्रत्येकाच्याचं आरोग्यासाठी गरजेची असते.आणि सेक्स हा तर नवरा बायको मधील महत्त्वाचा विषय आहे.याबद्दलची सर्व माहिती दोघांना हवीच हे मी मागील लेखांमध्ये सांगितले आहेच.पण जेव्हा दोन शरीरं एकत्र येतात तेव्हा दोघांच्या आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची असते.शरीराला ,कपड्यांना घामाचा वास येणं,तोंडाला दुर्गंधी येण, अवयवांची स्वच्छता नसणं या गोष्टी सेक्सुअल लाईफवर खूप परिणाम करीत असतात.यावर बरेच लेख उपलब्ध आहेत.सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर दोघांची शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता (मानसिक स्वच्छता याचा अर्थ समजून घ्या), आजूबाजूचे वातावरण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.खूपजण असे असतात की, सकाळी अंघोळ केलेली असते आणि रात्री तसेच बेडवर जातात.किंवा कामावरून घरी आल्यावर औपचारिकता म्हणून हातपाय धुतले जातात.दोन शरीरं एकत्र येताना मन जितकं स्वच्छ हवं तितकंच दोन्ही शरीरं देखील स्वच्छ हवीत.पण खूपदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.मुळातंच आयुष्य हे स्त्री, पुरुष आणि त्यांच्यातला सेक्स याभोवतीच जास्त फिरत असतं.आणि विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे की,ज्यांच सेक्सुअल लाईफ चांगलं आहे ते दांपत्य खूप आनंदात असतात.तुमच मानसिक स्वास्थ्य देखील यावरच अवलंबून असतं.एवढ सारं आहे तर मग याविषयी अज्ञान का? आज कित्येक घरं अज्ञानामुळे संघर्षात संपून जातात.म्हणूनच पुन्हा तोच मुद्दा...... दांपत्य जीवन जगताना याविषयी माहिती असायला हवी.एकमेकांविषयी आदर, प्रेम असायला हवं.तरच सेक्सुअल लाईफ उत्तम बनू शकतं.त्याचबरोबर एकमेकांना एकमेकांच्या शरीराविषयी ओढ, प्रेम वाटायला हवं.नाहीतर तो एक सक्तीचा बलात्कारच ठरतो.ज्याची कोणीच कुठे वाच्यता करीत नाही.
लग्न झालं की,पहिली रात्र साजरी करताना,खोली सजवली जाते, सुवासिक अत्तर फवारला जातो, दोघेजण अगदी स्वच्छ होऊन नवनवीन कपड्यात तयार होतात.पण काही दिवसातंच त्यांच आयुष्य यांत्रिक बनून जातं.पहिली रात्र...हे एक प्रतिक आहे... एकत्र येण्यापूर्वी स्वच्छता राखणं, वातावरण प्रसन्न बनवणं.याचा अर्थच मुळी हे नेहमी असंच व्हावं असा असतो.याचा अर्थ काही महाभाग असा घेतील की, रोजचं बेड सजवायचा का?...पण याचा अर्थ असा आहे की दोघांमध्ये सेक्सुअल संबंध येताना स्वच्छता हवी.वातावरण प्रसन्न हवं.पण नव्याचे नऊ दिवस संपले की,याचा विचार केलाच जात नाही.मग हळूहळू दोघेही एकमेकांपासून शरीराने आणि मनानेही दूर जाऊ लागतात.त्यामुळे मानसिक कुचंबणा,भांडण, घरातील शांती, समाधान संपुष्टात येणं असे बरेच प्रकार घडतात.म्हणूनच शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं.हे जिथे शक्य होतं....तिथे सामोपचाराने प्रश्र्न सोडवले जातात.
समुपदेशक..... सुधा पाटील सांगली