शनिवार, ३१ मे, २०२५

पालक आणि मुलांचे शिक्षण

🌹पाल्यांचे शिक्षण आणि पालकांची मानसिकता 🌹
     शिक्षणानं माणूस सुशिक्षित बनतो.जीवन यशस्वी बनवणं, जगातील ज्ञानाचा साठा आत्मसात करणं, विचार करून जीवन सुकर बनवणं शिक्षणानं शक्य होतं.त्यामुळे शिक्षणाकडे आधुनिक पालकांचा ओढा वाढला आहे.प्रत्येक पालकाला वाटतं की, आपलं पाल्य खूप शिकावं, मोठं व्हावं.यासाठी आजचा पालक धडपडत आहे.त्यासाठी तो हवा तितका पैसा खर्चायला तयार आहे.बरेच पालक ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यांना वाटतं की,काहीही होवो पण आपल्या मुलांनी शिकायला हवं.मग त्यासाठी पालक महागड्या शाळेत अगदी कर्ज काढून मुलांना घालतात.भरमसाठ फी अगदी लहान गटापासून भरली जाते.जेव्हा उच्च शिक्षण घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत अशीही वेळ येते.
   पण खरं शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाच्या व्याख्या काहीही असोत पण जीवन जगताना तुमचे सर्व व्यवहार तुम्हाला उत्तमरित्या करता येणं म्हणजे शिक्षण! खरं तर एखादी नोकरी मिळवण्यासाठी सर्टिफिकेट लागतं आणि म्हणूनच हा शिक्षणाचा उहापोह केला जातो.नाहीतर शाळाविना शिक्षण घेता येतं.जीवन जगताना प्रत्येक क्षण आपणांस काहीतरी शिकवून जातो.ते सारं शिक्षणच आहे.एका कार्यक्रमात राठोड नावाचे शिक्षक म्हणाले की,मला माझ्या मुलांना माणूस म्हणून जगता येईल असं शिक्षण द्यायचं आहे.खरं आहे, माणूस म्हणून जगायला शिकवत ते खरं शिक्षण!
    पण हल्ली शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे.आपल्या पाल्यांन ज्ञान घेतलं की केवळ परीक्षेपुरती माहिती घेतली याचा विचार केला जात नाही.विविध परीक्षा,माहितीचा भरणा, मार्क्स जास्तीत जास्त मिळवणं याची जणू शर्यतचं चालली आहे.आपल्या आजूबाजूला,घरात निरिक्षणातून अनेक गोष्टी मुलांना शिकवता येतात.पण शिक्षण जणू पुस्तकांशिवाय, भरमसाठ मार्कांशिवाय नसतंच असं पालकांना वाटतं.मला तरी वाटतं की, दहावीपर्यंत तरी पालकांनी महागड्या शाळेत मुलांना घालून उगाचंच पैसा खर्च करु नये.खरी पैशाची गरज तर दहावीनंतर असते.पण अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की, महागड्या शाळेत मुलांना घातलं तरच त्यांचं शिक्षण होईल.पण शाळा कोणतीही असो मुलं त्यांच्या गतिनुसार कुठेही स्वत:च शिकत असतात.मला इथं डार्विन या शास्त्रज्ञाचं उदाहरण सांगावसं वाटतं.ज्या डार्विनने जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला,तो शाळेत रमला नाही.प्रगती अगदी कमी.त्याच्या वडीलांनी हा काही शिकणार नाही म्हणून त्याला धर्मोपदेशक होण्यासाठी पाठवले.त्यावेळी त्याला प्रवास करताना निसर्गाची गोडी लागली.प्रचंड निरिक्षण करून त्याने निसर्गातील अनेक सजीवांचे सांगाडे गोळा केले.आणि अनेक वर्षे निरिक्षण आणि अभ्यास करून जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला.सांगायचा मुद्दा हा की, मुलं स्वयंप्रेरणेने जास्त शिकतात.आणि त्यांची आवड जेथे तेथेच ते रमतात,प्रगती करतात.पण आजकाल पालक आपली स्वप्ने मुलांवर लादताना दिसतात.तसंच स्वत:च्या स्टेटससाठी मुलांवर अनेक गोष्टी लादतात.इतर मुलांशी तुलना करतात.पण पालक हे विसरतात की,प्रत्येक मूल भिन्न असतं.म्हणूनच अगदी नैसर्गिकरीत्या त्यांचं शिक्षण होऊ द्यायला हवं.जगण्यासाठीचं खरं शिक्षण हे मुलांना आजूबाजूच्या निरिक्षणातूनच मिळतं असतं.त्यामुळे पालकांनी शिक्षणाच्या शर्यतीत आपल्या मुलांना उगाचंच पळवू नये असं मला वाटतं.शिक्षण व्हावं याकडे लक्ष द्यावं पण अट्टहास आणि सक्ती नसावी.कारण प्रत्येक मूल त्याच्या गतीनं शिकतच राहतं.पालक उगाचंच नाहक काळजी करुन शिक्षण त्यांच्यावर लादत राहतात.पण एक लक्षात ठेवा की, लादलेल्या गोष्टी पूर्ण होतात पण यशस्वी होत नाहीत.म्हणूनच पाल्यांच शिक्षण म्हणजे काय हे समजून घेऊन विचार केला जावा.
सौ.सुधा पाटील सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...