शनिवार, ३१ मे, २०२५

प्रेमात पडतात...

🌹तरुण मित्र मैत्रिणींनो...प्रेमात पडताय..🌹
    आजकाल प्रेमात पडणं जणू फॅशनच झाली आहे.फिल्मि स्टाईल मारत तरूण तरूणी प्रेमात पडतात.ते काल्पनिक विश्व आणि आपलं वास्तव विश्व याची फारकत होऊ लागली की, लगेच यांचं प्रेम संपतं.सुरू होते मग नवी शोध मोहीम.खर तर हा लकी ड्रा सारखा प्रकार झाला आहे.कधी मुलगा फसवणूक करतो.तर कधी मुलगी फसवणूक करते.तर पालक आड येतात.
     परवाच एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रेमात मुलीचं फसवणूक करतात.घरच्यांचा विरोध दिसला की लगेच पलटी मारतात.मी हसुन म्हणाले,अरे पुरुष प्रधान संस्कृतीत मुलींना आजही पालकांच्या बंधनात रहावं लागतं.पळून जाऊन लग्न करण्याचं धैर्य सर्व प्रेमी युगलांमध्ये नसतं.पण आजकाल मुलगा फसवतो की मुलगी यापेक्षा प्रेमात निष्ठा कमी आणि फसवणूक जास्त होतं आहे.पण का?याचाही विचार होणं गरजेचं आहे.एक तर केवळ प्रेमावर जीवन जगता येतं नाही.प्रेमात पडणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं असतं.हेच तरुण पिढीला समजतं नाही.आईबापाच्या पैशावर रोमांस करत फिरणं म्हणजेच प्रेम अशीच काहीशी गोड समजूत तरुण पिढीची असते.कुठेतरी वाचलेलं उदाहरण....एक मुलगा केवळ प्रेयशीच्या प्रेरणेने यु.पी.एस.सी.परीक्षा पास झाला.आणि ती मुलगी सी.ए.झाली.नंतर दोघांनी लग्न केलं.याला म्हणतात,प्रेमाला शक्ती बनवणं.प्रेमाची परिभाषा समजून घेऊन प्रेम करणं.
    आजकाल मुला मुलींना प्रेम म्हणजे केवळ खेळ वाटतो.पण बाळांनो या खेळात तुम्ही एकमेकांचं जीवन उद्ध्वस्त करता.जरा विचार करा.तुमच्या फसवणुकीमुळे कोणीतरी आयुष्य संपवू शकतं.प्रेमावरचा लोकांचा विश्वास उडू शकतो.तुमची पिढी प्रेमापेक्षा भौतिक गोष्टीं, गिफ्ट यातच जास्त अडकते.कित्येक मुली आज पैशासाठी मुलांना फसवतात.मुलं लैंगिक सुखासाठी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.प्रेमाच्या नावाखाली असं घडतं असेल तर समाज तरी तुम्हाला का समजून घेईल?
    म्हणूनच माझी तरुण पिढीला नम्र विनंती आहे की,कृपया प्रेमाला कलंक लागेल असं वागू नका.प्रेम माणसाला घडवतं.आणि जगणं शिकवतं.आणि तेच प्रेम असतं.जिथंअपेक्षा, व्यवहार येतो तिथं प्रेम नसतंच.पडताय प्रेमात.... अवश्य पडा...पण डोळे उघडे ठेवून.नाहीतर खुशाल खड्ड्यात पडा.तुमच्या थिल्लरपणा मुळे लोकं सरळ सरळ म्हणणार आजची तरुण पिढी वाया जात आहे.प्रेमाला कलंकित करीत आहे.लैला मजनूच्या नुमत्या गप्पा मारु नका.तसं प्रेमही करा.नाहीतर त्यात पडूच नका.कारण तुमच्या खेळामुळे कोणीतरी संपून जातं.असं आदर्श प्रेम करा की, इतरांनी तुमच्या कडे बोट दाखवलं पाहिजे.प्रेमात निष्ठा हवी.एकमेकाविषयी आदर हवा.तरच ते प्रेम यशस्वी होतं.मुलींनाही कळकळीची विनंती...कृपया एखाद्या गरीब मुलाच आयुष्य, करिअर बरबाद करु नका.समाजात कितीतरी उदाहरणे घडली आहेत की, श्रीमंत मुलगी घरच्यांच्या विरोधाला बळी पडते.आणि त्या मुलाचं,त्याच्या कुटुंबाचं नाहकच अस्तित्व संपतं.अशांना मी सरळ सरळ म्हणेन की, तुम्ही प्रेमाच्या वाटेवर जाऊ नका.पालकांनी देखील आपल्या पाल्यांना समजून घ्याव.कोणाच तरी आयुष्य उद्ध्वस्त करायला आपणही तितकेच जबाबदार असता.
   म्हणूनच माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आधी प्रेमाची परिभाषा समजून घ्या.प्रेम आणि करिअर यांची सांगड घाला.आणि स्वत:च्या हिमतीवर प्रेम यशस्वी करा.फिल्मी भूलभुलैया यात अडकू नका.फिल्मी प्रेम आणि वास्तव प्रेम यात फरक असतो.फिल्मी प्रेम तीन तासाचंच असतं.पण तुमचं प्रेम आयुष्यभर टिकवायचं असतं.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

कविता वाचन..

 





पालक आणि मुलांचे शिक्षण

🌹पाल्यांचे शिक्षण आणि पालकांची मानसिकता 🌹
     शिक्षणानं माणूस सुशिक्षित बनतो.जीवन यशस्वी बनवणं, जगातील ज्ञानाचा साठा आत्मसात करणं, विचार करून जीवन सुकर बनवणं शिक्षणानं शक्य होतं.त्यामुळे शिक्षणाकडे आधुनिक पालकांचा ओढा वाढला आहे.प्रत्येक पालकाला वाटतं की, आपलं पाल्य खूप शिकावं, मोठं व्हावं.यासाठी आजचा पालक धडपडत आहे.त्यासाठी तो हवा तितका पैसा खर्चायला तयार आहे.बरेच पालक ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यांना वाटतं की,काहीही होवो पण आपल्या मुलांनी शिकायला हवं.मग त्यासाठी पालक महागड्या शाळेत अगदी कर्ज काढून मुलांना घालतात.भरमसाठ फी अगदी लहान गटापासून भरली जाते.जेव्हा उच्च शिक्षण घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत अशीही वेळ येते.
   पण खरं शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाच्या व्याख्या काहीही असोत पण जीवन जगताना तुमचे सर्व व्यवहार तुम्हाला उत्तमरित्या करता येणं म्हणजे शिक्षण! खरं तर एखादी नोकरी मिळवण्यासाठी सर्टिफिकेट लागतं आणि म्हणूनच हा शिक्षणाचा उहापोह केला जातो.नाहीतर शाळाविना शिक्षण घेता येतं.जीवन जगताना प्रत्येक क्षण आपणांस काहीतरी शिकवून जातो.ते सारं शिक्षणच आहे.एका कार्यक्रमात राठोड नावाचे शिक्षक म्हणाले की,मला माझ्या मुलांना माणूस म्हणून जगता येईल असं शिक्षण द्यायचं आहे.खरं आहे, माणूस म्हणून जगायला शिकवत ते खरं शिक्षण!
    पण हल्ली शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे.आपल्या पाल्यांन ज्ञान घेतलं की केवळ परीक्षेपुरती माहिती घेतली याचा विचार केला जात नाही.विविध परीक्षा,माहितीचा भरणा, मार्क्स जास्तीत जास्त मिळवणं याची जणू शर्यतचं चालली आहे.आपल्या आजूबाजूला,घरात निरिक्षणातून अनेक गोष्टी मुलांना शिकवता येतात.पण शिक्षण जणू पुस्तकांशिवाय, भरमसाठ मार्कांशिवाय नसतंच असं पालकांना वाटतं.मला तरी वाटतं की, दहावीपर्यंत तरी पालकांनी महागड्या शाळेत मुलांना घालून उगाचंच पैसा खर्च करु नये.खरी पैशाची गरज तर दहावीनंतर असते.पण अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की, महागड्या शाळेत मुलांना घातलं तरच त्यांचं शिक्षण होईल.पण शाळा कोणतीही असो मुलं त्यांच्या गतिनुसार कुठेही स्वत:च शिकत असतात.मला इथं डार्विन या शास्त्रज्ञाचं उदाहरण सांगावसं वाटतं.ज्या डार्विनने जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला,तो शाळेत रमला नाही.प्रगती अगदी कमी.त्याच्या वडीलांनी हा काही शिकणार नाही म्हणून त्याला धर्मोपदेशक होण्यासाठी पाठवले.त्यावेळी त्याला प्रवास करताना निसर्गाची गोडी लागली.प्रचंड निरिक्षण करून त्याने निसर्गातील अनेक सजीवांचे सांगाडे गोळा केले.आणि अनेक वर्षे निरिक्षण आणि अभ्यास करून जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिला.सांगायचा मुद्दा हा की, मुलं स्वयंप्रेरणेने जास्त शिकतात.आणि त्यांची आवड जेथे तेथेच ते रमतात,प्रगती करतात.पण आजकाल पालक आपली स्वप्ने मुलांवर लादताना दिसतात.तसंच स्वत:च्या स्टेटससाठी मुलांवर अनेक गोष्टी लादतात.इतर मुलांशी तुलना करतात.पण पालक हे विसरतात की,प्रत्येक मूल भिन्न असतं.म्हणूनच अगदी नैसर्गिकरीत्या त्यांचं शिक्षण होऊ द्यायला हवं.जगण्यासाठीचं खरं शिक्षण हे मुलांना आजूबाजूच्या निरिक्षणातूनच मिळतं असतं.त्यामुळे पालकांनी शिक्षणाच्या शर्यतीत आपल्या मुलांना उगाचंच पळवू नये असं मला वाटतं.शिक्षण व्हावं याकडे लक्ष द्यावं पण अट्टहास आणि सक्ती नसावी.कारण प्रत्येक मूल त्याच्या गतीनं शिकतच राहतं.पालक उगाचंच नाहक काळजी करुन शिक्षण त्यांच्यावर लादत राहतात.पण एक लक्षात ठेवा की, लादलेल्या गोष्टी पूर्ण होतात पण यशस्वी होत नाहीत.म्हणूनच पाल्यांच शिक्षण म्हणजे काय हे समजून घेऊन विचार केला जावा.
सौ.सुधा पाटील सांगली

कविता माझी...

*हो....मला स्वच्छंदी जगायचं आहे*

हो मला स्वच्छंदी जगायचं आहे
तोडून पायातल्या बेड्या साऱ्या
उंच गगनात भरारी घ्यायची आहे.
स्वच्छंदी पक्षी होऊन,वाऱ्यासोबत धावायचं आहे, फुलांचा सुगंध मनसोक्त लुटायचा आहे..
हो..
मला स्वच्छंदी जगायचं आहे...

स्वतःच्या पायावर उभं राहून,
माझीच प्रतिभा मला वाढवायची आहे.
नवनवीन तंत्रज्ञान शिकून सारं
मला अपडेट होऊन जगासोबत चालायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

समजलं आहे मला आता निसर्ग नियम सर्वांना सारखेच आहेत.
म्हणूनच मला माणूस म्हणून जगायचं आहे.
शतकानुशतकाची झुगारून बंधने,आता जरा मोकळा श्वास घ्यायचा आहे.
हो..
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

माझं चालणं, माझं बोलणं, माझं हसणं, माझं हक्कासाठी लढणं, माझं हवं तसा पेहराव करणं.... सारं सारं.... कोणाच्या तरी अधीन आहे....ते सारंच आता थांबवायचं आहे...
माझा प्रत्येक क्षण आता... मला माझाच हवा आहे... म्हणूनच त्यासाठी मला लढायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे

चाकोरी सोडून आता वळणावळणाची वाट तुडवायची आहे...मोकळा श्वास घेऊन दबलेला आनंद उधळायचा आहे.
मलाच खूप खूप शुभेच्छा देऊन जिंकायचं आहे
छंद सारे जोपासून जीवनाचं अमृत चालायचं आहे.
हो...
मला स्वच्छंदी जगायचं आहे.

चला छंद जोपासूया..

🌹चला छंद जोपासूया.... आपलं मानसशास्त्र फुलवूया 🌹
     राकेश वरपे सर यांचे फेसबुक वरील हे दोन ग्रुप खूपच कौतुकास्पद आहेत.कारण यामुळे समाज विधायक असं कार्य उत्तमरित्या घडतं आहे.अनेक समुपदेशक, मानसशास्त्र प्रेमी आपापल्या परीनं समाजातील मानसिक विकृतींवर प्रकाश टाकत आहेत.आणि विविध छंद जोपासण्याची प्रेरणा देऊन अनेक सामाजिक विकृती कशा कमी होतील?माणूस आनंदी कसा बनेल? यासाठी प्रयत्न करणारे हे दोन्ही ग्रुप आहेत.यातील सर्व मेंबर एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे समाज जागृतीचं काम करीत आहेत.ही खरंच खूप मोठी समाजसेवा आहे.कारण सुंदर जगण्याचं गमक मानसशास्त्रातच आहे.पण त्याकडेच दुर्लक्ष होऊन माणूस सुंदर जीवनाला नैराश्याच्या खाईत लोटतो.यातून माणसाला बाहेर काढण्याचं काम मानसशास्त्र आणि त्याचे छंद करीत असतात.म्हणूनच हा सहसंबंध समजून घेऊन जीवन सोपं करुया.
     खरं तर अज्ञानामुळे माणूस अंधारात भटकतो.पण मानसिक आरोग्य, मनाचं कार्य, घटना आणि मानसशास्त्र यांचा सहसंबंध हे समजून घेतलं तर माणूस हे जीवन सहजपणे जगू शकतो.आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे.आपले छंद आपणास आनंद देतात.एकट असलं तरी एकाकी वाटू देत नाहीत.आपले छंद आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.म्हणूनच प्रत्येकाने आपले वेगवेगळे छंद सतत जोपासत राहिलं पाहिजे.जीवनात गरजेइतका पैसा आणि छंद सोबत असले कि आयुष्याचा उत्सव नक्कीच बनवता येतो.जीवनात आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवता येतो.अंगणात बसून आकाशातील चंद्र देखील  आनंदाचा प्रकाश तुमच्या मनात पेरतो.आजूबाजूचा सुंदर निसर्ग तुम्हाला जगणं शिकवतो.बस्स!तशी नजर हवी.निरिक्षण हवं.मग आयुष्य फक्त सुंदर वाटेल.अति अपेक्षा आपणांस आपल्या छंदांपासून दूर नेतात.मग माणूस नैराश्यात अडकत जातो.यातून आपणचं आपणास बाहेर काढू शकतो.इतर लोक फक्त मार्ग दाखवू शकतात.चालायच तर आपणच असतं.म्हणूनच जेव्हा जेव्हा नैराश्यात मन अडकू पाहत तेव्हा तेव्हा आपले छंद आठवावेत.ते जोपासावेत.त्यामुळे आपलं मन कलाटणी घेतं.प्रत्येक माणसांत काही तरी छंद असतातच.हे काळाच्या ओघात मागे पडत जातात.पण ते वेळोवेळी जोपासत रहावं.त्यामुळे मानवी मन,त्याच आरोग्य उत्तम राहू शकत.प्रत्येक गोष्ट, घटना यामागचं मानसशास्त्र प्रत्येकाला समजू लागलं तर नक्कीच जगण्याचे मार्ग सुकर होतील.म्हणूनच आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध लक्षात घेऊन आपले छंद जोपासा आणि हे जीवन सुंदर बनवा.खरचं "कसली ही दु:खं! किरकोळ तक्रारी साऱ्या!"
सौ.सुधा पाटील

हा खेळ हार्मोन्सचा

🌹हा खेळ हार्मोन्सचा 🌹

     मानवी जीवन एक गूढ आहे.कितीही शोध घ्या... काहीतरी निरुत्तर राहतंच.व्यक्ती तितुक्या प्रवृत्ती आढळतात.कोण,कसा हे ठामपणे सांगणंच अवघड!कारण कधी कोणती परिस्थिती येईल आणि त्यात मानवी वर्तन कसे असेल हे ठामपणे ओळखणे जवळजवळ अशक्य आहे.मनाचा अभ्यास करताना अर्थातच मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तनाचा अभ्यास करतात.परंतू हे मानवी वर्तन परीस्थितीनुरुप भिन्न भिन्न असू शकते.म्हणूनच एखादी व्यक्ती विचित्र वर्तन करू लागली की आपणास आश्र्चर्य वाटतं.आणि हे सारे खेळ घडतात ते मेंदूतून स्त्रवणाऱ्या हार्मोन्समुळे!
     पण मानवी शरीरात हे हार्मोन्सचं संतुलन का बिघडत?ते बिघडू नये किंवा हार्मोन्स बॅलन्स सदैव संतुलित रहावा यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का? घटना घडून गेल्यावरच हार्मोन्स प्रमाण कमी जास्त झाल्याने अशी अशी घटना घडली अशीच खूपदा चर्चा होतं असते.काही काळ अशा चर्चा रंगतात आणि पुन्हा मागे तसं पुढे अशी जीवनाची गाडी सुरू राहते.अस न होता आजकालच्या सुशिक्षित लोकांनी जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान काय आहे?मग ते आहाराबाबत असो,मानसिकतेबाबत असो, निरोगी जीवन शैली बाबत असो ते समजून घेतले पाहिजे.खरं तर मानवी जीवनाचं या हार्मोन्सच्या तालावर नाचत असतं.ज्या मानवी देहात हे हार्मोन्सचे स़तुलन उत्तम त्या मानवी जीवाचं जगणं उत्तम!त्याचाच जीवनरुपी डान्स परफारमन्स बेस्ट असंच हे गणित आहे.पण दुर्दैव हे कि, बऱ्याच जणांना हा हार्मोन्सचा खेळ न समजल्यामुळे जीवनात अपयश येतं.
     महिलांची मासिक पाळी देखील हार्मोन्स बदलामुळे अनियमित होते.अनेक शारिरीक तक्रारी निर्माण होतात.त्यावेळी त्यांना मानसिकता चांगली ठेवा, तणावाखाली राहू नका.योग्य संतुलित आहार घ्या.व्यायाम करा असाच सल्ला दिला जातो.एकंदरच काय आपलं जीवन सुंदर बनवायचं असेल तर या हार्मोन्स बाबाला खुश ठेवायला हवं.त्यानं त्यांच कार्य उत्तम करावं यासाठी आपणचं काळजी घ्यावी.शरीर आणि मन समजून घ्यायला हवं.आणि ते समजावून द्यायला हवं.आज अनेक मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक सुंदर माहिती पुरवत आहेत.ती सोशल मिडियाचा वापर करून प्रत्येक मानवापर्यत आपण पोहचवू शकतो.आपल्या शरीरात कोणती हार्मोन्स पाझरतात? त्यांचं नेमकं स्वरुप काय असतं? त्यांचं संतुलन कसं आपणचं राखायचं याची माहिती घेऊन आपण आपलं आयुष्य सुंदर,आनंदी बनवू शकतो.एक साधं उदाहरण... एखादं रोपं लावलं आणि त्याची जशी हवी तशी निगा नाही राखली तर ते रोप कधीच मोठ न होता, दिर्घकाळ न जगता मरून जातं.अगदी तसंच मानवी जीवन सुंदर,आनंदी बनवण्याचे मार्ग वापरून आपण हार्मोन्स चा खेळ चांगला रंगवू शकतो.म्हणूनच मानसशास्त्र समजून घेऊन जीवन सुंदर बनवूया.पण हो, यातही जो पळेल तो जिंकेल या उक्तीप्रमाणे जो जो हे समजून घेऊन जाणिवपूर्वक प्रयत्न करेल तोच हा हार्मोन्सचा खेळ जिंकू शकेल.
सौ.सुधा पाटील 8459730502

Life is not permanent

# Life is not permanent...

    अलीकडे वातावरण खूपच भयानक झालेलं आहे.कोरोनाचे वाढते आकडे,आपलाही यात नंबर लागेल की काय याची भीती,पुढे भविष्य काय असेल याच विवंचनेत मानव, जीव मुठीत घेऊन जगत आहे.खर तर मानवी मानसशास्त्र असं सांगतं की, तुम्ही जसा विचार करता तशीच लक्षणे तुमच्या शरीरात निर्माण होतात.खूपदा असं चित्र दिसून येत की, अगदी निरक्षर माणसं जीवनात खूप खंबीर असतात.आणि शिकलेली माणसं सारं कळतं असूनही वळत मात्र नाही याच मानसिकतेतून जगताना दिसतात.पण जगण्याचा तत्त्वज्ञान आणि शिक्षण याचा तसा काहीच संबंध नाही.ज्याला हे तत्त्वज्ञान समजतं आणि जगता येतं तो बिनधास्त मस्त आयुष्य जगून ही यात्रा संपवून जातो.
 साऱ्या मानव प्राण्यांना हे माहिती आहे आपलं जीवन हे पर्मनंट नाही.जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळचं आहे.पण तरीही मरणाच्या भीतीने आधीच शंभर वेळा माणूस मरून जातो.पण जर मनात कसलीही भीती न बाळगता जेव्हा मृत्यू यायचा आहे तेव्हा तो येणारच आहे त्याची उगाचंच चिंता आज कशाला? मी माझा आज मस्त जगेन.अशी विचारसरणी मनात नित्य निर्माण केली जावी.मी असं नाही म्हणत की हे लगेच जमेल.कारण मानवाला आयुष्याची आसक्ती फार असते.माणूस आयुष्य सुंदर कसं करावं याच्या विचारांपेक्षा मरणाची भीती जास्त बाळगतो.आणि हे सुंदर आयुष्य असंच काळजी, विवंचना, हेवेदावे, अहंकार यातच संपवून टाकतो.पण ज्याला कळतं की, आपलं मन जसा विचार करेल तसंच आपल्या आयुष्यात घडेल,तो माणूस सदैव मनात चांगले विचार कसे राहतील याचा विचार करतो.खूप आयुष्य म्हणजे खरं जीवन नव्हेच.मिळालेल आयुष्य तुम्ही कसं जगता यावर त्या आयुष्याचं मोल ठरतं असतं.उद्याच्या मरणाचा विचार आज करत राहिलात तर एखादा किडा जसं लाकूड आतून पोखरून काढत राहतो तसा तो नकारात्मक विचार तुम्हाला आतून पोखरून काढतो.आणि हे तुम्हाला समजतही नाही.वेळ निघून जाते आणि माणूस मानसिक आजारांना बळी पडतो.म्हणूनच या जगात पैसा,नाती, आयुष्य काहीच स्थिर नसतं.म्हणूनच येणारे प्रसंग झेलत,त्यांना तोंड देत आनंदाने ही जीवन यात्रा संपवायची असते.किड्या मुंगीप्रमाणे जगायचं की,आजचा दिवस फक्त माझा असं समजून आनंदाने जगायच हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं.वपुंच एक वाक्य आहे..."या अशाश्वत आयुष्यात सातत्याने माणसाला शाश्वत काहीतरी हवं असतं."
आणि याच नादात माणूस हे जगणंच विसरून जातो.सतत भीती, अपेक्षा,दुःख यांच्या दडपणाखाली माणूस जगत राहतो.पण न भीता समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे गेले की, आपोआपच लढण्याचं बळ निर्माण होतं.तुमच्या मानसिक शक्तींची  तुम्हालाच  जाणिव होऊ लागते.मुळातंच प्रत्येक माणसात प्रचंड मानसिक ताकद असते.पण ती सर्वांनाच वापरता येत नाही.पण ती शक्ती आपण स्वत:च शोधून काढायची असते.ती सापडली की,भीत भीत जगणं संपून जातं.भिऊन रोज मरण्यापेक्षा धैर्याने जगून एकदाच खरंखुरं मरावं.जीवन जर पर्मनंट नाही तर मग उगाचच त्याचा मोह तरी कशाला? याचा अर्थ जीवनाबद्दल प्रेम नसावं असा नाही.
कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली राहून आपल्याच शरीरात नकारात्मक उर्जा निर्माण करू नका.जेवढं आयुष्य वाट्याला येणार आहे तेवढ मी आनंदाने,सुखाने जगेन हीच भावना मनात सतत निर्माण करावी.आणि यासाठी प्रयत्न करावेच लागतात.मनात आलं म्हणून, एखादं प्रेरणादायी लेक्चर ऐकलं म्हणून लगेचच मन सकारात्मक होईल असं नाही.कारण ऐकलेले सुंदर विचार केवळ कानाला थडकून बाहेर जाऊ शकतात.म्हणूनच मनाला सकारात्मक ठेवणं, भयमुक्त जगणं यासाठी आपणंच प्रयत्न करावे लागतात.

सुधा पाटील सांगली

प्रेम

प्रेम 
प्रेम! शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम पुलकित होऊन जातो.खर तर साऱ्या सृष्टीला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य या अडीच अक्षरात आहे.प्रत्येक मानव जातीचा जन्म आपल्या आईच्या उदरातून होत असतो.आपण जन्माला आल्या आल्या टोहो फोडत असतो.परंतू आईने तिच्या छातीला बिलगून घेताच आपण जणू स्वर्गीय आनंद अनुभवतो.आणि तिथेच प्रेमाचा जन्म होतो.आईच्या उबदार स्पर्शात अफाट प्रेम आहे याची ती पहिली जाणीव आपणास होते.प्रेमाला शब्द लागतच नाहीत.एका स्पर्शातचं त्याची क्षमता अफाट असते.म्हणजे प्रेमाचं उगमस्थान जणू स्पर्शच!
      त्यानंतर आपणास ओळख होते ती इतर नातेवाईकांची.त्यांच्या प्रेमाची!प्रेम एक दिव्य अनुभूती,दिव्य शक्ती आहे.याला व्यवहार जोडला गेला की,यात डोकावतात मतभेद आणि कलह.पण जिथे खरं प्रेम असतं तिथं असतं सामंजस्य! अर्थात हे दोन्ही कडून असावं लागतं.एकांगी कोणतीच गोष्ट यशस्वी होत नाही.सुधा मूर्ती म्हणतात, सचोटी रक्तात असावी लागते.अगदी तसंच प्रेम ही भावना हृदयात असावी लागते.म्हणूनच म्हणतात की,प्रेम लाभे प्रेमळाला! मूळात खरं प्रेम, खोटं प्रेम असं काही नसतंच.एक तर प्रेम असतं किंवा नसतं.प्रेम ही भावना मनात असावी लागते.ती जोपासावी लागते.प्रेमात जपणं असतं,जोपासणं असतं.प्रेमाचंच दुसरं नाव त्याग असतं.प्रेमात आपल्या माणसांचा आहे तसा स्विकार असतो.इथे मला मोहब्बते या फिल्ममधीलओळीआठवतात...."कोई प्यार करे तो तुमसे करे, जैसा हो वैसा करे,कोई तुम्हें बदलके प्यार करे,तो वो प्यार नहीं सौदा करे!"या ओळी खूप काही सांगून जातात.
 खरं तर प्रेम ही भावना सर्वच नात्यांसाठी तितकीच महत्त्वाची आहे.परंतू आपल्या मानव जातीत 'प्रेम'हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते केवळ प्रियकर आणि प्रेयसी!प्रेम हे फक्त त्यांचीच मक्तेदारी नसते.मानव प्राणी जगतो ते याच दिव्य भावनेवर!दु:खाच्या क्षणी मनावर आपल्या आप्तजणांची फुंकर ही लाखमोलाचा आधार असते.हे आप्तजण रक्ताचेच असतील असं नाही.जिथे व्यवहाराविना प्रेम असतं, जपणं असतं,जाणिवा असतात ते खरं नातं!पण आजकाल सर्वांचीच तक्रार असते की, असं प्रेम दुर्मिळच आहे.पण आपण इतरांकडून अशा प्रेमाची अपेक्षा करताना आपणही आधी असं अटींविना प्रेम करायचं असतं हेच विसरून जातो.खरं तर जिथे तक्रारीच जास्त असतात तिथे प्रेम नसतंच.प्रेमाच्या दिव्यत्वाची प्रचिती येणारे तसे दुर्मिळच असतील.कारण खुपदा यात समोरची व्यक्ती तशी नाही अशाच तक्रारी जास्त असतात.पण जिथे दोन्ही बाजूला प्रेम उमगलेलं असतं, समजलेलं असतं तिथेच या दिव्य भावनेची प्रचिती घेता येते.प्रेमाच्या अभिव्यक्तीच स्वरुप हे वेगवेगळ्या नात्यांनुसार भिन्न असेल, परंतु त्याचा मूळ भाव सर्वाठायी एकच असतो.इथे एक इंग्रजी कविता सांगाविशी वाटते...
That's Real Love
I love you; because
I need you; it's negative.
I need you; because
I love you; it's positive.
But I love you because
It's without a because.
That's why I love you
All the good and bad
As it is in you.
I love you;I need you
I love you;I want you
That's real love.
वरील ओळींचा अर्थ ज्याचा त्याने समजून घ्यायचा असतो.आपणा सर्वांना माहीत आहे की, प्रेम हे निरपेक्ष असतं.प्रेमात जपणं असतं.आणि ते जपणं पोकळ शब्दांतून नाही तर ते कृतीतून दाखवून द्यायचं असतं.पण आपण सारेच अडकतो ते केवळ शब्दात! मग आम्हाला हवे असतात चंद्र तारे अन् प्रेमाचे वारे! वास्तव जीवनात जगताना दोन आपुलकीचे शब्द, कधीकधी नि: शब्द असा स्पर्श मनाला उभारी देत असतो.आणि हेच ते प्रेम असतं.नातं कोणतही असो त्याचा बेसंच मुळी प्रेम आहे.आणि ते ज्याला उमगतं तिथं निश्र्चितच प्रेम रुजतं.खरं तर प्रेमाचं बीजं हृदयात असावं लागतं.ज्याला प्रेम देता येत त्यालाच ते घेताही येतं.सतत नात्यात व्यवहार पाहणाऱ्यांना प्रेम उमगावं ते कसं?
व.पु.म्हणतात,प्रेम केवळ सहवासाने निर्माण होतंच नाही.तसं असतं तर, अगदी लहानपणापासून एकत्र राहणाऱ्या भावाबहिणीत ते अपार दिसलं असतं.कधी कधी वर्षानुवर्षे एकत्र राहूनही माणसं अनोळखी आणि प्रेमाचा लवलेशही नसणारी दिसतात.पण कधी कधी मैलोनमैल असणाऱ्या मनांमध्ये ते प्रेम जीवंत दिसतं.याचाच अर्थ प्रेम ही दिव्य भावना रुजायला मनं जुळावी लागतात.प्रेमात हक्क नसतो,पण आपलेपणा असतो.प्रेमात आहे तसा स्वीकार केला जातो.तिथे वाद कमी पण सुसंवाद जास्त प्रमाणात दिसून येतो.प्रेम वास्तवात जगतं.अपेक्षा विरहीत देणं हे प्रेमातंच असतं.प्रेमाचा अंकुर तिथेच रुजतो जिथे तशी मनं असतात.प्रेमाची भाषा शब्दांपेक्षा स्पर्शावर जास्त आधारलेली असते.म्हणूनच डोळ्यांची भाषा, खांद्यावरील हात, उबदार मिठी माणसाला दहा हात्तींचं बळ देतात.प्रेम माणसाला जगणं शिकवतं.जगायचं बळ देतं.शेवटी ज्याचा त्याचा दृष्टीकोन! पण प्रेम म्हणजे दैवी शक्ती! माणुसकीचा आधार आणि मानवी जीवनाची शक्ती आहे. पण ही दिव्य भावना समजून घेणारे आणि वागणारे असावे लागतात.तसे खूपजण आपल्या आजूबाजूला असतातही.ते प्रेमाला आपली शक्ती बनवून जीवन सुंदर बनवतात.
सौ.सुधा पाटील सांगली
8459730502

पालकत्व आणि मानसशास्त्र

🌹 पालकत्व आणि मानसशास्त्र 🌹

      मुलांना जन्माला घालणं आणि पालक होणं यात खूपच फरक आहे.पालकत्व ही तशी खूप मोठी जबाबदारी आहे.परदेशात मुलं जन्माला घालण्यापूर्वी आर्थिक स्थिरता, शारीरिक आरोग्य याचा विचार केला जातो.स्त्रीची शारीरिक क्षमता चांगली तयार करून मगच तेथील पती,पत्नी बाळाचा विचार करतात.त्यामुळे निरोगी मुलं जन्माला येतात.पण आपल्या देशात सारंच विचित्र आहे.लग्न झालं की घरचे लगेच बाळाचा विचार करतात.त्यासाठी दोघांच मनं,शरीर तयार आहेत का?याचाही विचार केला जात नाही.अविचाराने किंवा मुलं म्हणजे देवाची देणगी असा अंधविश्वास यामुळे खूपदा अपंगत्व असणारी,कुपोषित अशी बालके जन्माला येतात.त्यांना सांभाळताना कुटुबाची कसरतच होते.आणि अशा बालकांचे होणारे हाल तर अति भयानक असतात...
    वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना वाढवताना पालकांची परीक्षा असते.पण कोणत्या वयात मुलांशी कसं वागावं हे पालकांना समजलं की, पालकत्व सोपं बनतं.पण आश्र्चर्य म्हणजे सुशिक्षित पालकांना देखील उत्तम पालकत्व जमतं नाही.आणि जरी बऱ्याच जणांना वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना कसं वाढवायचं याची माहिती असली तरीही ती केवळ माहितीच राहते.कारण ती माहिती वास्तवात वापरली जात नाही.पालकांचा संयम कमी पडतो.त्यांना समजावलं तरीही ते आपल्या हट्टाला चिकटून राहतात.खूपदा पालकांना मुलांच्या मानसिकतेपेक्षा त्यांचा इगो महत्त्वाचा वाटतो.किशोरावस्थेतील मुलं आणि पालक यांच्यात तर खूप संघर्ष दिसून येतो.आणि याच वयात वडील आणि मुलगा यांच्यात अंतर पडत जातं.पण मुलांच मानसशास्त्र समजून घेऊन त्यांच संगोपन केले तर मुलं आणि पालक यांच्यात उत्तम नातं निर्माण होऊ शकते.
    आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पालकांना आपल्या मुलांपेक्षा त्यांचं स्टेटस खूप महत्त्वाचे वाटते.त्यामुळे मुलांवर अनेक गोष्टी नाहकच लादल्या जातात.पण आपण हे विसरतो की,स्वातंत्र्य हे  प्रत्येक जीवाला निसर्गतः असतं.त्यामुळे प्रत्येक जीव आपापल्या परीनं जगत असतो.म्हणूनच मुलांचं स्वातंत्र्य जपत त्यांच संगोपन करावं लागतं.संस्कार हे पालकांच्या आचरणातून मुलं आपोआप शिकत असतात.ते शिकवावे लागत नसतात. म्हणूनच मानसशास्त्रीय ज्ञानाचा वापर करून मुलांच संगोपन केले तर पिढीतील संघर्ष टाळता येऊ शकतो.उत्तम पालक होण्यासाठी मुलांचं मानसशास्त्र समजणं खूप गरजेचं आहे.मानवी आयुष्याचा पायाचं मानसशास्त्र घालतं असतं.हे मन,त्याची रुपं ओळखता आली की, आयुष्य सुंदर जगता येतं.
सौ.सुधा पाटील

आत्महत्या..

माणूस आत्महत्या का करतो?

    आत्महत्या!का करतात माणसं?अनेकांची अनेक कारणं असू शकतात.पण जेव्हा आत्महत्या कोणी तरी करतं तेव्हा मात्र सारेच यावर चर्चा करू लागतात.खरं तर माणसं स्वत:चं जीवन जगताना इतरांचा फार विचार करतात.त्यामुळे एखादं अपयश किंवा एखादी समाज अमान्य घटना आयुष्यात घडली कि, माणूस कोलमडून जातो.अशा वेळी त्याला मानसिक आधार न मिळता तो चुकीचा कसा,त्याने काय करायला हवं होतं,तो योग्य निर्णय कसा घेऊ शकला नाही यावरच उपदेश केला जातो.मग पिडाग्रस्त व्यक्ती देखील अशा वेळी खचून जाते.संकटाचा सामना करण्याची क्षमता नसेल, मानसिक कमकुवतपणा असेल तर माणूस आत्महत्या करण्याचा विचार करू लागतो.मी खूप जवळच्या दोन ते तीन व्यक्तींच्या आत्महत्या अनुभवल्या आहेत.आत्महत्येपूर्वी त्यांची मानसिकता मी जवळून पाहिली आहे.तरीही व्यक्तीपरत्वे कारणं, मानसिक अवस्था,मनाची शक्ती भिन्न भिन्न असू शकते.एखादं अपयश पचवता न आल्याने देखील मुलं आत्महत्या करतात.
     माझे गुरुजी लहानपणी सतत म्हणायचे, आयुष्यात कितीही भयानक संकट येऊ दे ,अशा वेळी पाषाणासारखं कठीण बनायचं पण आत्महत्या करायची नाही.आत्महत्या दुबळे,भेकड लोकं करतात.हेच मनात खोलवर रुजलं गेलं.त्यामुळे आयुष्यात कधी कधी भयानक प्रसंग आले तेव्हा तेव्हा गुरुजी डोळ्यासमोर यायचे आणि मग मनं दिर्घ श्वास घेऊन कणखर बनायचं.काहीही होवो हा पर्याय नाहीच नाही असा ठामपणा मनात निर्माण व्हायचा.आजही मानसिक कणखरपणा माणसांमध्ये यायला हवा.जीवन जगताना खरं जगणं सोडून नाहक अपेक्षांचं ओझं घेऊन माणूस जगतं राहतो.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या क्षसता ओळखून स्वत:चा  स्विकार खूप महत्त्वाचा आहे.तोच स्विकार न झाल्याने आपण इतरांचा विचार करत उभं आयुष्य संपवतो.या खेळात जर अपयश आलं तर ते दु:खं पचविण्याची ताकद माणसांत हवी.मानसिक दुबळेपणा, अपेक्षांचं ओझं, लोक काय म्हणतील?स्वत:चा अस्वीकार अशा अनेक कारणांमुळे माणूस आयुष्य संपवण्याचा विचार करतो.आणखी एक मला जाणवलं की,जी माणसं मनासारखं झालं नाही की सतत आत्महत्येचा विचार करतात ती शेवटी तोच पर्याय निवडतात.पण जे सतत काहीही झालं तरी मी आत्महत्येचा विचार मनात आणणार नाही असं मनाला सतत बजावतात ती मनानं कणखर बनतं जातात.
    खरं तर,साने गुरुजी सारख्या मातृहृद्य़ी महान हस्तीने देखील आत्महत्या केली होती.अति हळवी माणसं देखील जीवनातील हार किंवा समाजातील विकृती सहन करू शकत नाहीत.परंतू आत्महत्या हा कोणत्याही समस्यांवरील उपाय नाहीच हे ठाऊक असूनही त्या हळव्या क्षणी माणसं हे वास्तव विसरतात.म्हणूनच तीव्र दुःख असलेल्या माणसांना वेळीच माणसिक आधार देणं गरजेचं असतं.परंतू त्याहुनही महत्त्वाचे म्हणजे आपण स्वत:चं आपलं मन कणखर बनवणं गरजेचं असतं.कारण आपला मित्र परिवार, नातेवाईक आधार देऊ शकतात पण तो आधार मनानं स्विकारून आपणचं आपणास मजबूत करायचं असतं.तसं मग जुनी माणसं खूपच मजबूत म्हणावी लागतील.कारण माफक अपेक्षा आणि डोंगर कोसळला तरी हिमतीनं त्याचा सामना करणारी! पण हल्ली आपणच आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपणास दबवत आहोत.साधं,सरळ आयुष्य नाहीच!जे नाही ते नाही!जे आहे ते आहे! इतकं स्वच्छंदी आयुष्य जगायला हवं.तरचं ते आनंदाने जगता येईल.तशा मानवी आयुष्याच्या गरजा खूपच माफक असतात.परंतू भौतिक,नकली सुखाच्या मागे धावून माणूस जगणचं विसरत चालला आहे.आणि हो, लोक काय म्हणतील?या फालतू प्रश्नात अडकून आपण उगाचच दुबळे पडत जातो.म्हणूनच छान आणि मस्त जीवन जगता यायला हवं.जराशा अपयशाने मानसिकरीत्या दुबळं बनणाऱ्या पिढीला वेळीच सावरलं पाहिजे.एकाकी आयुष्य, मनातील भावनांचा निचरा न होणं,व्यथा जिथे मांडल्या जातील असं विश्वासाचं, हक्काचं ठिकाण नसणं अशी अनेक कारणे मानवी आयुष्य एकाकी बनवत आहेत.वेळीच मनं मोकळी व्हायला हवीत.वेळ कधीही, कोणावरही येऊ शकते.म्हणूनच चला तर मग....व्यक्त होऊया... एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा आधार बनूया.आपली भावी पिढी आपणचं मानसिक सुदृढ बनवूया.

सौ.सुधा पाटील

एका आईची दुसरी पाळी

🌹एका आईची दुसरी पाळी 🌹

     सामाजिक समस्या समजून घेतल्या तर त्या नक्कीच सुटू शकतात, फक्त त्या सोडविण्यासाठी मनात तळमळ असावी लागते.आज आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिन आहे.हळूहळू समाजात याविषयी जनजागृती होत आहे.आम्ही प्रशिक्षित महिला मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाची माहिती सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.खरं तर पुरुष वर्ग या विषयापासून पहिल्या पासूनच अनभिज्ञ आहे.याला कारणच आपली सामाजिक परिस्थिती आहे.पण काळ बदलत आहे.आपणही या सामाजिक समस्येचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.
     मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचं प्रशिक्षण मतिमंद मुलींच्या माता पालकांना देताना अनेक भयानक अनुभव समोर आले.ज्या समस्यांचा समाज कधी विचारचं करीत नाही.शेवटी ज्याच्या यातना त्यानेच भोगायच्या अशीच समाज निती आहे.मतिमंद मुलींना सांभाळणं तसं अवघड काम आहे.त्यात तर वयात आलेली मतिमंद मुलगी म्हणजे आई बापाच्या जीवाला मोठाच घोर असतो.अशा मुलींना मासिक पाळी म्हणजे काय हे समजतं नाही.त्यावेळी शोषकं व्यवस्थित वापरणं,स्वच्छता राखणं हे काहीही त्यांना समजतं नाही.अशा मुलींच्या आईंनाच त्यांचं सारं करावं लागतं.त्यामुळे मतिमंद मुलीची मासिक पाळी ही तिच्या आईची दुसरी पाळी असते असंच मला वाटतं.
    आपल्या समाजाची वासना इतकी भयानक कि,अशा निष्पाप मुलींना देखील साले ओरबाडून खातात.एक किस्सा असाच यावर जागृती करताना ऐकला होता.....एक मतिमंद मुलगी आई व आजी सोबत राहत होती.घरची गरीबी! पोटाच्या आगीसाठी आई बिचारी मंजुरीसाठी जाई.आजी मुलीला सांभाळत होती.अशा मुलींची शारीरिक वाढ झपाट्याने होत असते.ही मुलगी देखील वयात आली.आई आजीला दटावून सांगे कि,हिला एकटीला सोडून जाऊ नका.पण व्हायचं तेच झालं.ती मतिमंद मुलगी प्रेग्नंट आहे असं समजल्यावर तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.एवढी आजीनं काळजी घेऊन हे कसं घडलं? सांगताना देखील माझ्या अंगावर काटा उभा राहतोय.तिच्या मामानेच त्या मुलीशी संबंध ठेवले होते.आजीला आणि आईला खूप मोठा धक्का बसला.
     मित्रहो,अशा अनेक घटना आहेत.समाजातील नालायक विकृती आजूबाजूच्या मतिमंद भिकारी महिलांना देखील सोडतं नाहीत.आपणास या समस्यांची खूपदा जाणीव देखील नसते.मतिमंद मुलींची पाळीच्या काळात काळजी घेणाऱ्या माता खरंच धन्य आहेत.खूप मातांचे प्रशिक्षण घेताना अनुभव ऐकले.आपल्या मतिमंद लेकरांची अवस्था सांगून त्या धाय मोकलून रडत होत्या.क्षणभर मी देखील सुन्न झाले.त्या विधात्याला शिव्या देखील घातल्या.खरच अशा मुलींना सांभाळणं महा दिव्य असतं.तरीही त्यांच मातृत्व किती महान पहा,... असं निष्पाप लेकरू म्हणजे जणू देवाचं रुप समजून त्या त्यांचा सांभाळ करतात.सलाम अशा मातृत्वाला!🙏
     मला तर वाटलं की,अशा मुलींचं गर्भाशय पालकांनी स्वच्छेनं काढून टाकावं.कारण वासनेने अंध झालेल्या विकृत मनोवृत्तीला काही समजतं नाही.अशा मुली जर का याला बळी पडल्या तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते.म्हणूनच यावर समाजाने नक्की विचार करावा.
सौ.सुधा पाटील सांगली 8459730502

लग्न आणि सेक्स भाग 1ते4

*लग्न आणि सेक्स*भाग 1
समाजात फक्त दोनच प्रमुख जाती आहेत.एक स्त्री आणि दुसरी पुरुष.या दोघांच्या समागमातून पुढची पिढी तयार होत असते.तयार होणाऱ्या पिढीची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांच पालनपोषण व्हाव यासाठीच तर लग्न ही संस्था निर्माण झाली आहे.लग्न म्हणजे दोन मनांच मीलन! दोन जीव एकरुप होणं!अशा अनेक व्याख्या केल्या जातात.पण त्या केवळ साहित्यिक विश्वातच ऐकायला छान वाटतात.खरं तर वास्तव फार भयानक असतं.लग्न म्हणजे केवळ सेक्स साठी समाजानं दिलेला परवाना असतो. त्यामुळे कुठेतरी एक मर्यादा घातल्या जातात.परंतू खरा विचार केला तर अनेक लग्नं ही नंतर नंतर केवळ तडजोड बनतात.कारण जशा इतर मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स ही देखील मानवी जीवनास अत्यावश्यक अशी गरज आहे.परंतू नव्याचे नऊ दिवस झाले की नवरा बायको सेक्सकडे तितक्याशा गांभिर्याने पाहत नाहीत. आयुष्यात सेक्स ही मरेपर्यंत मानवाला हवी असणारी गरज आहे हेच ते विसरतात आणि मग संघर्ष सुरू होतो.खरं तर सेक्सला संभोग असं म्हणतात.याचा अर्थच समान भोग घेणं, समान आनंद घेणं असा आहे.परंतू यात स्त्री ही केवळ एक भोग वस्तु, मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषाच्या वीर्यस्खलनाच साधन या भावनेनेचं तिच्याकडे पाहिले जाते.किंबहूना तसेच संस्कार तिच्यावर लहानपणापासून केले जातात.त्यामुळे खुपदा बरचसं सेक्स विषयीची माहिती असूनही महिला गप्प बसतात.कारण तिच्यावर खुप तयारीची आहे,आधी अनुभव घेतला असेल असे टोमणे बसू नयेत असं तीला वाटतं.त्यामुळे बऱ्याच महिला मूल झाल्यावर त्याच्या संगोपनात स्वत:ला वाहून घेतात.खुपदा अति घरकाम, बाळाचं संगोपन यामुळे तिला सेक्सची भावना उरतच नाही.अशा वेळी पुरुष तिला समजून न घेता दोष देत राहतो.आणि तिथेच त्यांच्यात अंतर पडत जातं
  खरं तर अशावेळी पुरुष वर्गाने तिला सहकार्य करून तिच्यातील संवेदना जीवंत ठेवली पाहिजे.दोघांच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.कारण आरोग्य उत्तम असेल तरच उत्तम व आनंदी सेक्स लाईफ जगता येतं.स्त्रीवर्ग सतत कामात मग्न असल्याने सेक्सचा आनंद त्या घेऊच शकतं नाहीत.किंवा खूप जणींना खरा सेक्स काय हे माहितही नसतं.पुरुष वर्गही आपल्या बायकोलाही सेक्सचा आनंद घेता यावा याचा विचार करीतच नाही.केवळ यांत्रिकरित्या सेक्स उरकला जातो.यात भावना नसतातच.त्यामुळेच लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एका घरातही अनोळखी असल्याप्रमाणे राहतात.त्यांच नातं जणू यांत्रिक बनतं जातं.खरं तर प्रेम बळकट करण्याचा उत्तम मार्ग सेक्स असतो.विज्ञान हेच सांगते की, सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळेच आनंदी जीवन जगता येतं.अनेक ताणतणाव हे सेक्स मुळे कमी होतात.हे सारं खरं असलं तरी,याची जाणीव किती जणांना आहे? कितीजण याचा विचार करून आपलं सेक्स लाईफ हेल्दी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? हेही विचारात घ्याव लागेल.त्यात सेक्स बाबत महिलांना जागृत करणेही खूप गरजेचे आहे.कारण सेक्स या क्रियेत दोघांचा क्रियाशील सहभाग महत्त्वाचा असतो.आणि आजही याविषयी प्रचंड अज्ञान आहे.
   अरे जर स्त्री वर्गच याविषयी अज्ञानी राहिला तर मग ती नवऱ्याला साथ तरी कशी देणार?आज लग्न हे अरेंज असो किंवा लव्ह ते तेव्हाच नीट टिकू शकत जेव्हा तिथं सेक्स लाईफ हेल्दी असतं.नाहीतर मग केवळ ओढून ताणून तडजोड! मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करत असताना मला लक्षात आलं की, मुलं झाल्यानंतर महिला सेक्सला फार महत्त्व देत नाहीत.किंवा कामाचा ताण यामुळे त्यांची ईच्छाच राहतं नाही.त.यामळे संघर्ष वाढत जातात.नातं कोरडं बनतं जातं.अशावेळी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन यावर मार्ग काढला पाहिजे.त्यासाठी आधी सेक्स या विषयाची सखोल माहिती दोघांनाही असणं आवश्यक आहे.म्हणूनच निदान भावी पिढीला तरी याचं मार्गदर्शन करून लग्न ही संस्था बळकट केली पाहिजे.नाहीतर विवाहबाह्य संबंध वाढतच जाणार.कारण भूक लागली की माणूस जेवणं शोधतोच!हे अगदी नैसर्गिक आहे.मग तिथे स्त्री असो किंवा पुरुष!
   महिलांशी चर्चा करताना जाणवलं की, पुरुष वर्ग महिलांना केवळ भोगवस्तू याप्रमाणे वागणूक देतो.तीचा आदर केला जात नाही.पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे तिला केवळ गृहितचं धरले जाते.तिच्यावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार केले जातात.अशा ठिकाणी त्या नात्यात मानसिक जवळिकता राहतं नाही.त्यामुळे अशा स्त्रिया नवऱ्याशी संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात.नवऱ्याचा अनिच्छेने केलेला संभोग त्यांना बलात्कार वाटतो.तरीही पर्याय नसल्याचे बायका गप्प बसतात.अशी नाती शेवटपर्यंत तणावाखाली जगतात.आणि संपून जातात.यामुळेच अनेक महिला मनोरुग्ण बनत आहेत.यासाठी वेळीच जागृती गरजेची आहे.किमान यापुढचा समाज तरी आपण जागृत बनवू शकतो.
   सेक्सचा खरा आनंद तेच घेऊ शकतात ज्यांची मनं एकरुप होतात.कारण सेक्स शरीरांचा नसतोच.तो दोन मनांचा असतो.मनं सुंदर रित्या एकरुप झाली तरचं दोन शरीरं एकरुप होऊन संभोग करू शकतात.पण आपल्या समाजात सेक्स आणि लग्न यांचा संबंध केवळ मूलं जन्माला घालणं इतकाच आहे.जोवर ही विचार सरणी बदलत नाही तोपर्यंत समाजात अनेक गैरसमज पसरतं जाणार.म्हणूनच सेक्स आणि जीवन याचा सहसंबंध मानवास वेळीच सांगायला हवा.भविष्यात विचारी, निरोगी लग्नसंस्था निर्माण करायची असेल तर तरूण पिढीला आधी सेक्स विषयी ज्ञान दिले पाहिजे.सेक्स हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा अधिकार आहे.निरोगी, आनंदी मानवी जीवनाचा सेक्स हा महत्त्वाचा घटक आहे.म्हणूनच वेळीच हा विषय मोकळेपणाने समाजापुढे मांडूया.तरच समाज सुसंस्कृत बनू शकतो.
*सौ.सुधा पाटील सांगली*8459730502
लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

*लग्न आणि सेक्स*भाग2
    या विषयावर कालच थोडं लिहिलं.बऱ्याच जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.खर तर हा विषयाचं गहन आणि सखोल आहे.त्यावर विचार मांडावेत तितके कमीच आहेत.पण आज भाग दोन मध्ये अजून थोडे विचार मांडण्याचा हा प्रयत्न!
   कालचा लेख वाचून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने मला दोन याबाबतची सत्य उदाहरणे सांगितली.ज्यांची ती स्वत: साक्षीदार आहे.पहिलं उदाहरण एका मुलीचं..ती मुलगी लग्न झाल्यावर माझ्या मैत्रिणीला भेटली पण नववधूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हताच.तीनं चौकशी केल्यावर ती मुलगी म्हणाली, लहानपणापासून सेक्स म्हणजे घाण, वाईट असंच मला सांगितलं गेलं आणि लग्न झाल्यावर हेच घाण करायचं.मला किळस वाटते.मला त्यात इंटरेस्ट नाही.आता दुसरं उदाहरण...एक मुलगा त्याच्या आई व नववधूला घेऊन तपासायला माझ्या डॉक्टर मैत्रिणीनीकडे आला.तक्रार अशी की,ती नववधू नवऱ्याजवळ झोपायला तयार नाही.चौकशीअंती ती मुलगी म्हणाली, मला भीती वाटते.ते सगळं घाण वाटतं.असं म्हणून ती मुलगी रडायला लागली.कशीतरी समजून सांगून,तिला थोडा वेळ द्या असं तिच्या नवऱ्याला व सासूला समजावून पाठवलं.जाताना ते दोघे त्या नववधूला ओरडतच होते.पण दुसऱ्या दिवशी समजलं की,त्या मुलीनं आत्महत्या केली.खरचं धक्का बसला ही उदाहरणे ऐकून!
   खरंच विचार करायला हवा.मी लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं.असचं कोणाच्यातरी तोंडून.... मुलं ही आई-वडीलांच्या वासनेतून जन्माला येतात.तेव्हा काहीच कळलं नाही.पण ते वाक्य मनावर कोरलं गेलं होतं.मोठेपणी अर्थ समजायला लागल्यावर हेच वाक्य मी मैत्रिणींमध्ये खुपदा चर्चेला घेतलं.पण अशीच वरवरची चर्चा झाली.मागेच या विषयावर लिहावं वाटलं पण तोच सामाजिक पगडा आणि भीती! आणि तेव्हा लेखणी अजून धारदार आणि धाडसी नव्हतीच.पण एकविसाव्या शतकात आम्ही खूप शिकलो.पण आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवता नाही आल्या.पण समस्येचं मूळ शोधल्याशिवाय समस्या कधीच संपत नाहीत.एखाद्या मुरलेल्या रोगासारखी ही दबलेली समस्या सतत डोकं वर काढत राहते.म्हणूनच योग्य वेळी योग्य ती काळजी आजार होऊच नये म्हणून घ्यायची असते.
   खरंच प्रेमापोटी अपत्ये जन्माला येतं असती तर आज मुलींचे गर्भ पाडले गेले नसते.कचरा कुंडीत कोवळे अंकुर सापडले नसते.अनौरस बालके अशी लेबलं काही मुलांवर दिसलीच नसती.अनाथाश्रमे ओस पडली असती.असो...ही पण एक भयानक सामाजिक समस्या आहेच.
   सेक्स लाईफचा नैतिक मार्ग म्हणून आपण या लग्न संस्थेकडे पाहतो.पण या संस्थेच्या दुबळेपणामुळे पाश्र्चात्य संस्कृती बोकाळत आहे.अनेक तरुण पिढीला लग्न नकोच आहे.लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृती बोकाळत आहे.पण का?याचा कुठेतरी विचार करायला हवा.एकीकडे आम्ही मुलींना सेक्स घाण असतो, वाईट असतो असे संस्कार करतो.आणि लग्न झालं की, फुलांनी सजवलेल्या पलंगावर तिला तेच करायची ही सुरुवात असं सांगतो.किती हा विरोधाभास!या अज्ञानामुळे कितीतरी कळ्या कोमेजून गेल्या असतील! कित्येक जीव आधी घुसमट सहन करून नंतर पर्याय नाही म्हणून परिस्थितीला शरणही गेले असतील.काळाच्या भयानक गर्तेत असंख्य कहाण्या लपल्या असतील.पण या विज्ञान युगात पुन्हा अशा कहाण्या तयार होऊ नयेत म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे.कारण आपणही या समाजाचे जागरूक घटक आहे.म्हणूनचं विवाह संस्था बळकट करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला विवाहपूर्व समुपदेशन करायलाच हवं.पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या बाईला आधार नसल्याने लग्नं टिकवली जायची.पण आज काळ बदलला आहे.मुलंमुली क्षणात घटस्फोट घेतात.यातूनही झालेल्या मुलांचे प्रश्र्न, त्यांच्या मनावर होणारा परिणाम या पुढच्या समस्या आहेतच.
या सर्व सामाजिक समस्या येऊच नयेत यासाठी लग्न म्हणजे काय? सेक्स म्हणजे काय?याची माहिती मुलामुलींना द्यायलाच हवी.तरच बलात्कार, अनैसर्गिक सेक्स अशा समस्यांना आळा बसेल.आमच्या मुलींना सुहागरात म्हणजे सजवलेला पलंग, मस्त नटणं सजणं म्हणजेच लग्न असं वाटतं.आजकालच्या मुलामुलींना सोशल मिडियामुळे बरीच माहिती मिळते.पण तीही अर्धवट आणि चोरून त्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होतात.म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशन करणाऱ्या संस्था बळकट करायला हव्यात.आमच्यावेळी असं कुठे काय होतं?असे फालतू प्रश्न उभा करण्यात काहीच अर्थ नाही.आपली पिढी अज्ञानातच वाढली.वाढत आहे, सेक्स ही एक नैसर्गिक गरज असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे त्यातील समस्या गाढायच्या! यातूनच समस्या वाढत जातात आणि कधीही न सुटणारा गुंता तयार होतो.आजची पिढी तडजोड करून संसार टिकवणारी नाही.मुली स्वावलंबी झाल्या आहेत.पूर्वी बाईला जगण्यासाठी माहेर किंवा सासर हाच आधार होता.बाईची वाईट अवस्था ही की,दिल्या घरीच मर!सर्व चांगलं असलं तर ठिक नाहीतर बाई मरायचीच! वाईट वाटतं की,जन्मदाते सुद्धा त्रास सहन कर पण तिथेच मर असं मुलीला म्हणायचे.आजही काहीजण तसंच म्हणतात.कारण  आपली सामाजिक परिस्थिती, सामाजिक संस्कार.पण जीवांशी खेळणारे संस्कार काय कामाचे?पण आज तशी परिस्थिती नाही.स्वत:च्या बायकोला छळणारा पुरुषही माझ्या मुलीला जपणारा जावई हवा असं म्हणतोच.हे वास्तव आहे.आणि म्हणूनच लग्न या संस्थेचा पायाच असणाऱ्या सेक्सची शास्त्रशुद्ध़ माहिती सर्व वयोगटातील मानव जातीला दिलीच पाहिजे.अगदी प्रेमात अखंड बुडालेली,एक दुजे के लिये असं म्हणणारी मुलं-मुली देखील सेक्स लाईफ असमाधानी असेल तर घटस्फोट घेतात.मग प्रेम गेलं कुठे? खरंच जरा वास्तव समजून घेऊया.भूक असह्य झाली की अगदी सभ्य माणूसही मागून किंवा चोरून खातोच! समाजात अनेक चोर निर्माण होतात ते केवळ गरचा अपुऱ्या राहतात म्हणूनच.कोणीही मानव मूळचा चोर नसतोच.अशा अनेक समस्या संपवायच्या असतील तर सेक्स हा विषय मोकळेपणाने समाजापुढे बोलून निकोप समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे.आणि मुख्य म्हणजे स्त्रीयांना यांत गौण समजणं म्हणजे मुर्खपणाचा कळस होईल.कारण आजकाल मुली महिलांवरील अत्याचार पाहून लग्नंच नको म्हणत आहेत.अस झालं तर काय होईल याचा विचार करा.सारीत तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप या संस्कृतीचा विचार करू लागली तर समाज किती धोक्यात येईल? यासाठीच स्त्री आणि पुरुष यांच्या उत्तम समायोजनाशिवाय उत्तम लग्न संस्था निर्माण होऊच शकत नाही.म्हणूनच सारासार विचार करून आपणच आपला समस्या सोडवून एक विचारशील समाज निर्माण करूया.
हा विषय नाजूक समजून अनेक समस्या दाबल्या जातात.यातूनच अनेक मनोविकृतींचा जन्म होतो आहे.आणिआपल्या समाजात मानसिक आरोग्य, मानसिक आजार याकडे दुर्लक्ष केलं जातं.कुटुंबात अनेक मानसिक आजार हे सेक्स मधील असमाधान हेच आहे.त्यात महिला वर्ग तर तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सहन करतो.सेक्स ही ओरबाडून खायची गोष्ट नाहीच.खरं वैवाहिक आयुष्य सुंदर करायचं असेल तर नवरा बायको दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या गरजा पूर्ण करायला हव्यात.एकीकडे बाई म्हणून तिचा अपमान करायचा आणि दुसरीकडे तिनं रात्री सारं विसरून पुरुषाला खुश करायचं अशी विचारसरणी असेल तर...अशक्य!कारण सेक्स हा मनांचा असतो.शरीर हे केवळ एक माध्यम असतं.म्हणूनच प्रेमाला, भावनांच्या ओलाव्याला महत्त्व आहे.हे ज्यांना कळतं त्यांचेच संसार एक दुजे के लिये बनतात.अन्यथा केवळ सामाजिक तडजोडी! आणि तडजोड म्हंटले की तिथं व्रण,यातना,असाह्यता आलीच.तिथं कुठे असणार प्रेमाचा अंकुर! म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला वेळीच आपण सावरूया.
सौ.सुधा पाटील सांगली
8459730502

# लग्न आणि सेक्स भाग 3#
    गेल्याच वर्षी लॉकडाऊनच्या काळात"लग्न आणि सेक्स"या विषयावर दोन भाग लिहिले.ते दोन्ही भाग खूपच व्हायरल झाले.महाराष्ट्रातील अनेक भागांतून फोन आले.वॉट्सअॅपवर  कमेंट्स आल्या.यावरून एक लक्षात आलं की,या विषयी अजूनही खूप अज्ञान आहे.यावर स्पष्ट बोलणं म्हणजे जणू एक अपराधंच! अशीच विचारसरणी दिसून येते.त्यातही एका बाईने यावर उघड उघड बोलणं म्हणजे फार मोठा सामाजिक अपराधच! पण याच एका गोष्टीभोवती दुनिया फिरताना दिसते.यातील असमाधानामुळे कित्येक जोडप्यांमध्ये संघर्ष दिसून येतो.तरीही मनातल्या मनात कित्येक प्रकरणे दडपली जातात.याची परिणिती मानसिक आजारात होताना दिसते.किंवा नवरा बायको यांच्या मधील नातं संपुष्टात येतं.किंवा कोरडं बनतं जातं.अशा समस्या निर्माण झाल्या तर नेमकं काय करावं? कोणाला विचारावं? कसं विचारावं? यातंच माणूस अडकून पडतो.पण अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे.यावर न लाजता स्पष्ट बोलून समस्या सोडवण्याची गरज आहे.
   "लग्ध आणि सेक्स" भाग १व२ वाचून माझ्या महिला भगिनींनी अनेक समस्या सांगितल्या.आणि भाग तीन लिहावा अशी विनंती केली.म्हणूनच हा पुढचा एक प्रयत्न....बदलाची सुरुवात व्हावी म्हणून.... तत्पूर्वी एक समुपदेशक म्हणून माझ्याकडे काही समस्या आल्या होत्या.ते आधी थोडक्यात नमूद करते....
1) मॅडम आमच्या लग्नाला सहाच महीने झाले.बायको आणि मी नोकरी निमित्त लांब राहतो.सुट्टिदिवशी एकत्र येतो.पण त्या दिवशी बायको दमलेली असते.हवा तसा प्रतिसाद देत नाही.
2) मॅडम,आम्हा दोघांमध्ये सतत भांडणे होतात.त्यामुळे आमच्या मनात एकमेकांबद्दल मनात राग असतो.त्याचा परिणाम सेक्स लाईफवरती होतो.
3) मला नवऱ्याचा स्पर्श नकोसा वाटतो.कारण तो कधीही प्रेमाने वागत नाही.
4) बायको मला तुम्हाला सेक्स शिवाय दुसरं काही सुचतंच नाही.तुमची सवय घाणेरडी आहे.अस सतत म्हणते.
5) मेनोपॉजमुळे योनीमार्ग कोरडा पडतो.त्यामुळे सेक्ससाठी मनाची तयारीच नसते.पण नवरा संशय घेतो.भा़डतो.आमच्यात महिनोमहिने अबोला राहतो.अलिकडेच आमचं नातं खूप कोरड झालंय.
6) मुलं मोठी झाली आता ....सुना आल्या आता..... काय तुम्हाला आता म्हातारचळ लागलंय...अशा कमेंट्स बायको सतत करते.मग मला नैराश्य येतं.
7) माझा नवरा सेक्स बाबतीत खूपच अडाणी होता.त्याला काही सांगायला गेलं की, तुला इतकं कसं माहित?तु चारसोबीस बाई आहेस असं म्हणायचा.सततच्या भांडणाने आमचा घटस्फोट झाला.
   वरील काही समस्या नमुन्यादाखल मांडल्या आहेत.त्या थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला जाणवत असतील.किंवा याही पेक्षा वेगळ्या समस्या इतरांच्या असतील.पण मी भाग एक मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, "सेक्स हा दोन मनांचाच असतो." जेव्हा दोन मनं संमतीने एकत्र येतात,त्याच्यात सामंजस्य निर्माण होतं, एकमेकांबद्दल प्रेम,आदर असतो तेव्हाच सेक्स फुलतो.अन्यथा बाकी साऱ्या समस्या आणि....एक प्रकारचा भयानक बलात्कार.....!
   हा विषय तसा खूपच नाजूक असतो.जेव्हा नवरा बायको यांच्यामध्ये  मोकळेपणाने संवाद होतो तेव्हा अशा समस्या दोघे मिळून सोडवू शकतात.खूपदा बायकांच्या डोक्यात नवऱ्याने दिलेला त्रास सतत घोळत असतो.त्या मनाने दुखावल्या जातात.अशा परिस्थितीत नवरा जेव्हा सेक्सची अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्या मनापासून प्रतिसाद देऊ शकतं नाहीत.त्यांची मानसिक तयारी नसल्याने त्यांचं शरीर हवा तसा प्रतिसाद देऊ शकतं नाही.म्हणूनच तुमचं सेक्सुअल लाईफ हे तुमच्या मानसिक नात्यावर आधारित असतं.खर तर सेक्स ही स्त्री आणि पुरूष यांची मूलभूत नैसर्गिक गरज आहे.या भावना दबल्या गेल्या की, अनेक मानसिक विकृती निर्माण होतात.उतार वयात माणसे विचित्र वागू लागतात.बलात्कार सारखे भयानक सामाजिक गुन्हे घडतात.माणूस नैराश्यात जातो.कित्येक विवाह संबंध घटस्फोटापर्यंत जातात.वयाच्या चाळीशी नंतर महिलांचा मेनोपॉज, शारिरीक तक्रारी,लाज,अज्ञान यामुळे देखील दांपत्यात सेक्स वरून संघर्ष निर्माण होतात.बऱ्याच महिलांचा असा समज असतो की,मेनोपॉज नंतर सेक्स करायचाच नसतो.किंवा तसा समज नसला तरी महिलांना ते नकोसं वाटतं.याची कारणं प्रत्येकीची वेगवेगळी असतात.पण काहीही असो लग्न ही संस्थाच सेक्सच्या पायावर उभारलेली असते.म्हणूनच दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या सामोपचाराने  सोडवणं गरजेचं असतं.उतार वयात नवरा आणि बायको हेच एकमेकांचा आधार असतात.परंतू सुरवातीच्या काळात दोघांनी एकमेकांना समजून घेतलं नाही,एकमेकांचा आदर केला नाही, एकमेकांना हवा तो स्पेस दिला नाही, एकमेकांना वेळ दिला नाही,तर त्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफ वरती होतो.मनामध्ये दरी पडत जाते.म्हणूनच तुमचं सेक्स लाईफ सुंदर बनवायचं असेल तर सेक्स विषयीचं अज्ञान दूर करा.त्याविषयीची सविस्तर शास्त्रशुद्ध माहिती घ्या.न लाजता आपल्या पार्टनरला आपल्या अपेक्षा सांगा.आणि हो....यात स्त्री आणि पुरूष असा भेद करू नका.कारण या क्रियेत दोघांचा सहभाग महत्त्वाचा असतो.तरच खरा आनंद घेता येतो.यामध्ये दोघापैकी एकजण जरी अज्ञानी असेल तर संघर्ष हा अटळ असतो.
  म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष दोघांनी मिळून सहजीवन सुंदर बनवायचं असतं हे समजून घ्यावं.आणि हे सहजीवन सेक्सुअल लाईफ चांगलं असेल तरंच सुंदर बनू शकतं.काही समस्या असतील तर न भांडता दोघे मिळून सोडवू शकतात.कारण या जगात एकही अशी समस्या नाही की जी सुटू शकणार नाही.महिलांनी देखील न लाजता आपल्या पार्टनरला काय हवं याचा विचार करावा.आणि पुरुषांनी हे लक्षात घ्यावं की, बायकोचं मन नाराज करून सेक्स लाईफ हवं तसं कधीच होतं नाही.हा एक समतोल आहे.ज्याची जबाबदारी दोघांच्या खांद्यावर असते.ही गरज पोटाच्या भुकेइतकीच महत्त्वाची असते.जे कपल यात समाधानी असतात तेच हे आयुष्य सुंदर बनवून जगतात.अज्ञानामुळे देखील खूप चुका होतात.काय हवं, काय करायला हवं हेच खूप जनांना समजतं नाही.म्हणूनच मानवी जीवनाचा पाया असणारा "सेक्स" समजून घेऊन संघर्ष टाळता येतो.
शेवटी विचार ज्याचा त्याचा.... just think....
समुपदेशक....सौ.सुधा पाटील

# लग्न आणि सेक्स भाग..4

    लग्न आणि सेक्स या विषयाचे तीन भाग यापूर्वी लिहिले आहेत.मला वाटलं की,इतकी माहिती लोकांना या विषयावर विचार करण्यासाठी योग्य आहे.शेवटी हा एक नाजूक आणि मोकळेपणाने बोलण्याचा विषय नाही असंच मत आजही खूप जणांचं आहे.त्यात या विषयावर एका बाईने तर अजिबात बोलायचं नाही.जणू हा अलिखित नियमच आहे.पण तरीही या विषयाची समाजात जागृती व्हावी, समाजातील बलात्कार ही समस्या कमी व्हावी,याविषयीचं अज्ञान दूर व्हावं,याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत याचसाठी या लेखाचे भाग लिहिले.हा भाग चार लिहिण्याच कारण असं की.....* परवा एका बाईचा फोन आला.ती म्हणाली की,तुमचे तीनही लेख वाचले.छान आहेत.काळाची गरज आहे.पण तुम्ही अजून एक मुद्दा मांडला नाही. कोणता बरं?....ताई माझा नवरा खूप अस्वच्छ आहे.त्याची शारीरिक स्वच्छता नसते.त्यामुळे मला त्यांच्या जवळही जावू वाटत नाही.प्रतिसाद नाही दिला की,संशय घेतो.वादावादी होते.मला खरंच घटस्फोट घ्यावासा वाटत आहे.मी तिला म्हणाले,अग स्वच्छतेविषयी तु त्याला सांगायचंस ना!...त्यावर ती म्हणाली, अहो खूप सांगितले.पण ऐकत नाही.आणि म्हणतो याचा आणि स्वच्छतेचा काय संबंध?
दुसरं एक फोन......ताई, माझ्या नवऱ्याच्या अस्वच्छतेमुळे मला वारंवार इन्फेक्शन होतं.डॉक्टरांनी याविषयी त्याला माहिती सांगितली आहे.पण तरीही तो ऐकत नाही.
वाचकहो.... वरील दोन उदाहरणे ही काल्पनिक नाहीत.असे अनुभव अनेक जोडप्यांना येत असतील.खर तर वैयक्तिक स्वच्छता ही प्रत्येकाच्याचं आरोग्यासाठी गरजेची असते.आणि सेक्स हा तर नवरा बायको मधील महत्त्वाचा विषय आहे.याबद्दलची सर्व माहिती दोघांना हवीच हे मी मागील लेखांमध्ये सांगितले आहेच.पण जेव्हा दोन शरीरं एकत्र येतात तेव्हा दोघांच्या आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची असते.शरीराला ,कपड्यांना घामाचा वास येणं,तोंडाला दुर्गंधी येण, अवयवांची स्वच्छता नसणं या गोष्टी सेक्सुअल लाईफवर खूप परिणाम करीत असतात.यावर बरेच लेख उपलब्ध आहेत.सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर दोघांची शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता (मानसिक स्वच्छता याचा अर्थ समजून घ्या), आजूबाजूचे वातावरण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.खूपजण असे असतात की, सकाळी अंघोळ केलेली असते आणि रात्री तसेच बेडवर जातात.किंवा कामावरून घरी आल्यावर औपचारिकता म्हणून हातपाय धुतले जातात.दोन शरीरं एकत्र येताना मन जितकं स्वच्छ हवं तितकंच दोन्ही शरीरं देखील स्वच्छ हवीत.पण खूपदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.मुळातंच आयुष्य हे  स्त्री, पुरुष आणि त्यांच्यातला सेक्स याभोवतीच जास्त फिरत असतं.आणि विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे की,ज्यांच सेक्सुअल लाईफ चांगलं आहे ते दांपत्य खूप आनंदात असतात.तुमच मानसिक स्वास्थ्य देखील यावरच अवलंबून असतं.एवढ सारं आहे तर मग याविषयी अज्ञान का? आज कित्येक घरं अज्ञानामुळे संघर्षात संपून जातात.म्हणूनच पुन्हा तोच मुद्दा...... दांपत्य जीवन जगताना याविषयी माहिती असायला हवी.एकमेकांविषयी आदर, प्रेम असायला हवं.तरच सेक्सुअल लाईफ उत्तम बनू शकतं.त्याचबरोबर एकमेकांना एकमेकांच्या शरीराविषयी ओढ, प्रेम वाटायला हवं.नाहीतर तो एक सक्तीचा बलात्कारच ठरतो.ज्याची कोणीच कुठे वाच्यता करीत नाही.
    लग्न झालं की,पहिली रात्र साजरी करताना,खोली सजवली जाते, सुवासिक अत्तर फवारला जातो, दोघेजण अगदी स्वच्छ होऊन नवनवीन कपड्यात तयार होतात.पण काही दिवसातंच त्यांच आयुष्य यांत्रिक बनून जातं.पहिली रात्र...हे एक प्रतिक आहे... एकत्र येण्यापूर्वी स्वच्छता राखणं, वातावरण प्रसन्न बनवणं.याचा अर्थच मुळी हे नेहमी असंच व्हावं असा असतो.याचा अर्थ काही महाभाग असा घेतील की, रोजचं बेड सजवायचा का?...पण याचा अर्थ असा आहे की दोघांमध्ये सेक्सुअल संबंध येताना स्वच्छता हवी.वातावरण प्रसन्न हवं.पण नव्याचे नऊ दिवस संपले की,याचा विचार केलाच जात नाही.मग हळूहळू दोघेही एकमेकांपासून शरीराने आणि मनानेही दूर जाऊ लागतात.त्यामुळे मानसिक कुचंबणा,भांडण, घरातील शांती, समाधान संपुष्टात येणं असे बरेच प्रकार घडतात.म्हणूनच शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं.हे जिथे शक्य होतं....तिथे सामोपचाराने प्रश्र्न सोडवले जातात.
समुपदेशक..... सुधा पाटील सांगली...

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...