शनिवार, ३१ मे, २०२५

पालकत्व आणि मानसशास्त्र

🌹 पालकत्व आणि मानसशास्त्र 🌹

      मुलांना जन्माला घालणं आणि पालक होणं यात खूपच फरक आहे.पालकत्व ही तशी खूप मोठी जबाबदारी आहे.परदेशात मुलं जन्माला घालण्यापूर्वी आर्थिक स्थिरता, शारीरिक आरोग्य याचा विचार केला जातो.स्त्रीची शारीरिक क्षमता चांगली तयार करून मगच तेथील पती,पत्नी बाळाचा विचार करतात.त्यामुळे निरोगी मुलं जन्माला येतात.पण आपल्या देशात सारंच विचित्र आहे.लग्न झालं की घरचे लगेच बाळाचा विचार करतात.त्यासाठी दोघांच मनं,शरीर तयार आहेत का?याचाही विचार केला जात नाही.अविचाराने किंवा मुलं म्हणजे देवाची देणगी असा अंधविश्वास यामुळे खूपदा अपंगत्व असणारी,कुपोषित अशी बालके जन्माला येतात.त्यांना सांभाळताना कुटुबाची कसरतच होते.आणि अशा बालकांचे होणारे हाल तर अति भयानक असतात...
    वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना वाढवताना पालकांची परीक्षा असते.पण कोणत्या वयात मुलांशी कसं वागावं हे पालकांना समजलं की, पालकत्व सोपं बनतं.पण आश्र्चर्य म्हणजे सुशिक्षित पालकांना देखील उत्तम पालकत्व जमतं नाही.आणि जरी बऱ्याच जणांना वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना कसं वाढवायचं याची माहिती असली तरीही ती केवळ माहितीच राहते.कारण ती माहिती वास्तवात वापरली जात नाही.पालकांचा संयम कमी पडतो.त्यांना समजावलं तरीही ते आपल्या हट्टाला चिकटून राहतात.खूपदा पालकांना मुलांच्या मानसिकतेपेक्षा त्यांचा इगो महत्त्वाचा वाटतो.किशोरावस्थेतील मुलं आणि पालक यांच्यात तर खूप संघर्ष दिसून येतो.आणि याच वयात वडील आणि मुलगा यांच्यात अंतर पडत जातं.पण मुलांच मानसशास्त्र समजून घेऊन त्यांच संगोपन केले तर मुलं आणि पालक यांच्यात उत्तम नातं निर्माण होऊ शकते.
    आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पालकांना आपल्या मुलांपेक्षा त्यांचं स्टेटस खूप महत्त्वाचे वाटते.त्यामुळे मुलांवर अनेक गोष्टी नाहकच लादल्या जातात.पण आपण हे विसरतो की,स्वातंत्र्य हे  प्रत्येक जीवाला निसर्गतः असतं.त्यामुळे प्रत्येक जीव आपापल्या परीनं जगत असतो.म्हणूनच मुलांचं स्वातंत्र्य जपत त्यांच संगोपन करावं लागतं.संस्कार हे पालकांच्या आचरणातून मुलं आपोआप शिकत असतात.ते शिकवावे लागत नसतात. म्हणूनच मानसशास्त्रीय ज्ञानाचा वापर करून मुलांच संगोपन केले तर पिढीतील संघर्ष टाळता येऊ शकतो.उत्तम पालक होण्यासाठी मुलांचं मानसशास्त्र समजणं खूप गरजेचं आहे.मानवी आयुष्याचा पायाचं मानसशास्त्र घालतं असतं.हे मन,त्याची रुपं ओळखता आली की, आयुष्य सुंदर जगता येतं.
सौ.सुधा पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...