फादर्स डे.... शब्द पुष्पांजली माझ्या लाडक्या बाबांसाठी....जे अनमोल आहेत माझ्यासाठी.. ज्यांच्यामुळे मी आणि माझं अस्तित्व आहे...
खरं तर आई विषयी खूप लिहिलं.पण आपल्या मुलीला शिकवून स्वत:च्या पायावर उभं करून तिला स्वावलंबी बनवण्याचं स्वप्न पाहून ते जिद्दीने पूर्ण करणाऱ्या माझ्या बाबांविषयी लिहिणं आजवर झालंच नाही.याची खरंच खंत वाटते.पण आम्ही लेखिका ग्रुपमध्ये फादर्स डे निमित्त हा जो उपक्रम घेण्यात येत आहे त्यामुळे बाबांसाठीच्या भावना व्यक्त करता येत आहेत.खर तर जीवन जगण्यासाठीचं धैर्य देणारा माझा बाबा कधीच शब्दात मावणारा नाहीच.
माझे बाबा मिलिटरी मॅन होते.त्यामुळे खूपच कणखर पण मनाने खूपच प्रेमळ! बाहेरच्या जगाच ज्ञान असल्याने तसेच मिलिटरीत वीस वर्षे काढल्याने त्यांना मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं.म्हणूनच आईचा विरोध पत्करून त्यांनी मला डी.एड. केलं.नोकरी लागल्यानंतरच माझ्या लग्नाचा विचार त्यांनी केला.त्याकाळी मुलींना जास्तीत जास्त दहावी पर्यंत शिकवायचे.पण त्यांनी तुला नोकरी लागल्यावरच तुझ्या लग्नाच बघायचं हा मला दिलेला शब्द खरा केला.
माझ्या बाबांचा माझ्यावर खूप जीव होता.माझे सारे लाड यांनी पुरवले.ते नेहमी म्हणायचे,'आपलं नशीब आपणंच घडवायचं असतं.कष्ट करा... हवं ते मिळेल हे त्यांचं ब्रीद आजही प्रेरणा देत राहतं.त्यांच्यामुळे माझं बालपण खूप सुंदर गेलं.ते एक आठवण सांगायचे....मी लहानपणी झोपत नसले कि ते माझ्यासाठी एक गाणं म्हणायचे....ताई गुणाची माझी छकुली झोका दे दादा म्हणू लागली.मग मी शांत झोपी जायचे.माझ्या बाबांनी मुलगा मुलगी असा भेद कधीच केला नाही.माझ्या बाबा हे कर्मावर निष्ठा असणारे होते.तसेच ते खूपच प्रेमळ आणि काळजी घेणारे असे होते.आई आजारी असली की ते स्वत: सारं काम करायचे.ते स्वत:ची कामे स्वत: करायचे.तेच स़स्कार नकळत मनावर उमटले.धाडसी,करारी आणि खरेपणा हे माझ्या बाबांचे गुण मनानं आपोआप उचलले.आजही बाबा एक आदर्श बनून प्रेरणा देत राहतात.
सुधा पाटील सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा