मैत्री स्त्री आणि पुरुषाची.....
आयुष्याच्या सुंदर वळणांवर जगण्यास उभारी देत असते ती "मैत्री"! जगातलं सर्वात सुंदर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं असतं.यालाही इतर नात्यांप्रमाणे अपवाद असू शकतो.पण जिथं बंधनांचे बांधंच नसतात ते नातं मैत्रीचं असतं.मैत्री याबद्दल काय आणि किती बोलावं तितकं थोडच आहे.पण जिथे मनाची कवाडे नित्य उघडलेली असतात तिथं मैत्रिचं रोपटं अलगद रुजतं.आणि दोन्ही बाजूने जमीन सकस आणि पौष्टिक लाभली तर ते रोपटं एका वटवृक्षात रुपांतरीत होतं.अशी मैत्री चिरकाल टिकते आणि एकमेकांचा आधार बनते.
पण गहन प्रश्न उभा राहतो ते स्त्री आणि पुरूष यांच्या मैत्री बाबत!पण का?याची कारणं अनेकांची अनेक असू शकतील.कारण जेवढे मानवी जीव या पृथ्वीवर आहेत तेवढे अनुभव आहेत.तसेच तेवढे चष्मे आहेत.त्यामुळे यात मतभिन्नता असू शकते.पण या जगात मैत्री होण्यासाठी कोणती बंधनं नाहीत.विचार,स्वभाव जुळू लागले कि मैत्री होते.मग ती दोन पुरुपांची असू शकते, दोन स्त्रियांची असू शकते किंवा ती एखाद्या स्त्री आणि पुरूष यांची असू शकते.फक्त आता समाजाने ते मान्य करायला हवं आणि आपला चष्मा साफ ठेवायला हवा.खर तर पुरुष आणि स्त्री यांची निखळ मैत्री असूनही त्यावर शंका घेण्याची आपली मानसिकता बनली आहे.कारण हेच कि, प्रेमाचं नातं असेल ते लपवून मैत्री आहे असंच म्हंटल जातं.दुसरं म्हणजे निसर्गतः स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये लैंगिक भाव असल्यामुळे खूपदा ती भावना प्रबळ झाली तर तुमचं मैत्रिचं नातं तितकं विश्वासहार्य राहत नाही.त्यामुळे समाज साहजिकच त्यावर शंका घेऊ लागतो.म्हणूनच स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये मैत्री असेल तर ती "मैत्रीइतकी"मैत्री निखळ कशी राहू शकेल याचाही विचार करायला हवा.....
दोन जीवांमध्ये निखळ मैत्री नक्कीच होऊ शकते.पण जर का मैत्रीच्या नावाखाली शारीरिक भावनांची पूर्ती करण्याकडे कल असेल तर ती शुद्ध, निखळ मैत्री होऊ शकत नाही.समाजात स्त्री आणि पुरूष यांच्या मैत्री मध्ये खूपदा हाच भाव दिसून आल्यामुळे समाज या नात्याकडे शुद्ध भावनेने पाहत नाही.पण याचा अर्थ स्त्री आणि पुरुष यांची निखळ मैत्री नसते असं नाही.आजकाल बदललेल्या समाजात अशी निखळ मैत्री आहे.आणि असायलाच हवी.याच कारण असं की, निसर्गतः दोन विजातीय धूर्वांमध्ये आकर्षण असते.याच नियमाप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांची निखळ मैत्री झाली तर त्यात जास्त विश्र्वसनीयता येण्याची शक्यता असते.तसंच दोन स्त्रीयांच्या बाबतीत संघर्ष जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एका वैचारिक व्यासपीठावर एक स्त्री आणि पुरूष यांची मैत्री होऊ शकते....
खरं तर अशी मैत्री असू शकते का?याचा विचार करण्यापेक्षा ज्यांना हे विचार पटतात,जे अशी मैत्री असू शकते यावर विश्वास ठेवतात किंवा जे अशा मैत्रीच्या नात्यात आहेत त्यांनी आपलं नातं निभवावं.शेवटी माणसानं तेच करावं जे त्याच्या मनाला पटतं.जर स्त्री आणि पुरूष यांनी आपली मैत्री प्रामाणिकपणे निभावली तर त्यावर आक्षेप कोणी घेण्याचा प्रश्नच येत नाही.आणि तसंही समाजात नेहमीच दोन विचार प्रवाह असतात.आणि ते असणारच.त्यामुळे ज्यांना हे विचार पटतात त्यांनी ते अवश्य आचरणात आणावेत.शेवटी काय, जे टिकाऊ असतं ते टिकतंच! म्हणूनच विचार बदलले कि आपोआप समाज बदलतं जातो.जे जुने विचार सतत गतिमान होऊन पुढे पुढे आले आहेत ते बदलायला हवेत.जर अशी मैत्री हवी असेल तर त्यासाठी मनातील मैत्रभावना बळकट करायला हवी.स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्रभावना पक्की असेल तर समाजही अशी मैत्री नक्की मान्य करेल.शेवटी समाज म्हणजे तरी कोण? आपणचं सारे ना?मग आपणचं स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये असणारी मैत्री मान्य करायला हवी.कारण निसर्गतः भेद नसतोच.भेद आहे तो आपल्या दृष्टीकोनात! म्हणूनच आपला दृष्टिकोन आता बदलूया.उशीरा का होईना पण बदल हा हळूहळू स्वीकारला जातोच.
वर्षानुवर्षे तेच विचार हस्तांतरित करण्यापेक्षा आधुनिक विचारांची देवाणघेवाण करून समाजाला बदल घडवून आणता येतो.ज्यांना हे पटतं त्यांनी बदलासाठी अवश्य प्रयत्न करावेत.
सौ.सुधा पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा