बुधवार, २२ जुलै, २०२०

प्रेमाची अष्टाक्षरी

🌹I love you 🌹

      "I love you"ही अष्टाक्षरी म्हणजे मानवी जीवनातील ओअॅसीस! एखादा वाईट क्षण असावा आणि कोणीतरी मानसिक आधार देऊन म्हणावं, don't worry. I love you.मनाला उभारी येते.माझं तुझ्यावर प्रेम आहे.असं कोणीतरी म्हणालं तरी काही क्षण मन पाखरू तरंगायला लागतं.कारण या अष्टाक्षरी वाक्यात प्रचंड जादू आहे.माणसाला जगायचं बळ, पुन्हा उभारी घेण्यासाठी ओलावा यातून मिळतो.
खरं तर, मला पूर्वीचा काळ आठवतो आणि हसू येतं.कारण हे वाक्य जणू प्रियकर आणि प्रेयसी यांचीच मक्तेदारी होती.कोणी हे वाक्य उच्चारले तरी त्याला मार बसायचा.मग बिचारी झाडे,नदीकाठचे, समुद्र काठचे दगड,लेण्या प्रेमी जणांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीचं साधन बनायच्या.चोरी चोरी चुपके चुपके प्रेमाची अभिव्यक्ती व्हायची.त्यावेळचं साहित्य देखील खरं,त्यागावर आधारित प्रेम याच सुंदर वर्णन करीत असे.नकळत तसेच संस्कार पिढीवर होत होते.पण त्यातही लोकांना गोडी वाटायची.सुंदर, गुलाबी प्रेम पत्रांचा तो काळ होता! I love you! हे वाक्य सर्वच नात्यातील प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी कधी ते वापरले जातचं नसे.त्या वाक्याचा उघड उघड उच्चार जणू गुन्हाच होता.
     पण काळ बदलला.आणि या वाक्याचही आधुनिकीकरण झालं.आज आपण आई,बाबा,ताई, मित्र,प्रियकर, प्रेयसी सर्वांनाच I love you.असं म्हणू शकतो.आज कोणीही हे वाक्य उच्चारले म्हणून आक्षेप घेत नाही.व्हलेंटाइन डे ला आपण आपल्या सर्वांवरील प्रेमाची अभिव्यक्ती करू शकतो.आपलं निसर्ग प्रेम व्यक्त करताना देखील आपणI l love nature. I love animals.असं सहजच म्हणतो.
     पण जरा विचार करा की! हे केवळ एक वाक्य नाही.ही केवळ अष्टाक्षरी नाही. या वाक्यात आहे भावनांचा सागर!यातच आहे आधाराचा हात!यातच आहे प्रचंड आपुलकी, ओलावा, काळजी! केवळ या वाक्याची अभिव्यक्ती म्हणजे प्रेम नव्हे.बऱ्याचदा या वाक्याची अभिव्यक्ती न होताही प्रेम दिसून येत.आणि शंभरदा केवळ या वाक्याचा जप असणाऱ्या ठिकाणी हे प्रेम दिसून येत नाही.जेव्हा तुम्ही हे वाक्य कोणासाठी तरी उच्चारता तेव्हा तुम्ही कर्तव्यात बांधले जाता.जिथे खरंच प्रेम असतं तिथे ते कृतीतून दिसून येत.ते वाक्य साधंसुधं वाक्य नाहीच.त्यात आहे काळजी, आपुलकी, जपणं,आदर करणं.तिथे असते माफी!तिथे असतो त्याग!या साऱ्या गोष्टी जिथे दिसतात तिथेच या वाक्याची अभिव्यक्ती सार्थ ठरते.नाहीतर केवळ पोकळ शब्दांची जुळवाजुळव!
  हल्लीची तरुण पिढी तर क्षणाक्षणाला उगीचच या शब्दाचा वारेमाप उल्लेख करताना दिसते.त्या वाक्याची गहनता, जबाबदारी न कळणारी माणसं कधीच खरी नाती जोडू शकत नाहीत.पोकळ शब्द जसे वाऱ्यावर विरुन जातात तसेच अशी नाती क्षणात संपतात.म्हणूनच आज तरुण पिढीचे तासाला इथे ब्रेकअप होताना दिसतात.म्हणूनच त्याना "I love you" हे केवळ शब्द नसून जाणिवांचा,कर्तव्यांचा सागर आहे.हे वेळीच समजायला हवं.तारुण्यसुलभ आकर्षणाला तरुण पिढी प्रेम समजते.यातूनच I love you.या वाक्याने वह्यांची पानं सजतात.हळतात सजतात.टॅटू कोरले जातात.पण मनात खरा भाव कोरला जाईलच याची शाश्वती तशी कमीच असते.त्यातच कित्येक लोकं आपला स्वार्थ साधण्यासाठी या अनमोल वाक्याचा शस्त्र म्हणून वापर करताना दिसतात.अशांसाठी हे वाक्य केवळ अक्षरांची रचना असते.ईश्वरनिर्मित यातील उच्चतम भाव अशा राक्षस वृत्तीच्या लोकांना कधीच समजतं नाही.अशी माणसे सदैव दरिद्रीच राहतात.आज कित्येक मानवी जीव यात फसवणूक झाल्याने नाहक बळी जातात.म्हणूनच या सुंदर भावनेची परिभाषा सर्वांनी समजून घ्यायला हवी.जिथे आहे तसा स्वीकार होऊन या वाक्याची अभिव्यक्ती होते तिथेच खऱ्या अर्थाने प्रेमभाव फुलतो.
     म्हणूनच "I love you" या सुंदर रचनेत दडलेला परमोच्च आनंद,भाव,समर्पन समजून घेता आलं की,जीवनाचे रस्ते प्रकाशून जातात.
   सौ.सुधा पाटील सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...