बुधवार, २२ जुलै, २०२०

पृथ्वीची शतकोत्तर पाळी

🌹पृथ्वीची शतकोत्तर पाळी 🌹

     "मासिक पाळी"म्हंटलं की, डोळ्यासमोर येते स्त्री, तीचं मातृत्व, नवनिर्माण आणि अवघ्या मानवजातीचं उगमस्थान! निसर्गाने स्त्रीला मासिक पाळीचं वरदान दिलं.त्यामुळेच तर मानवाचा अंश निर्माण होत असतो.ज्यावेळी गर्भाशयात गर्भ नसतो  यावेळी गर्भाशयातील अस्तर एक टाकाऊ पदार्थ असतो.तो दर महिन्याला स्त्रियांच्या शरीरातून बाहेर टाकला जातो.हे चक्र सतत सुरू असतं.या पाळीमुळे स्त्री मुलं जन्माला घालू शकते.तसंच दर महिन्याला हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकल्यामुळे ती अंतर्बाह्य स्वच्छ,उत्साही,कार्यक्षम आणि प्रसन्न बनतं असते.
     आजची पृथ्वीवरील परिस्थिती पाहता सहजच मनात विचार आला की, आपल्या पृथ्वी मातेला पाळी तर आली नसेल!एका स्त्रीला दर महिन्याला पाळी येते.पण जेव्हा जेव्हा निर्मिती थांबते, पृथ्वीच्या गर्भात टाकाऊ पदार्थांचा साठा वाढतो तेव्हा तेव्हा अंतर्बाह्य स्वच्छ होण्यासाठी पृथ्वी मातेची पाळी होतं असावी.सारी मानव जात, पशुपक्षी,झाडेवेली सारा निसर्ग तिची बाळं आहेत.सर्वांनाच ती प्रेमानं जतन करते.पण मानव रुपातील बाळं मात्र तिला खूप त्रास देतात.तिचं सौंदर्य हिरावून घेतात.स्वत:च्या हिंसक, चंगळवादी सवयीतून मानवाने तिच्या गर्भात अफाट असा टाकाऊ पदार्थांचा साठा वाढवला आहे.म्हणूनच की काय, तिनं तिची पाळी बाहेर टाकायला सुरुवात केली आहे.जेव्हा नवनिर्माण थांबतं तेव्हा तेव्हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून पुन्हा पुनर्निर्माण करण्यासाठी तयारी करावी लागते.हाच निसर्ग नियम आहे.आणि याघडीला तेच घडतंय.
     आज सारा निसर्ग स्वच्छ,उत्साही झालाय.नद्या,नाले निर्मल झालेत.कित्येक वर्षांनी गंगा माता हसत खेळत स्वच्छ बनून बागडत आहे.मला वाटतं जेव्हा जेव्हा पृथ्वी मातेला टाकाऊ पदार्थांचा साठा असह्य होतो तेव्हा तेव्हा तीची अनेक शतकांनी पाळी येत असावी.त्यामुळे ती सारे टाकाऊ पदार्थ या शतकोत्तर पाळीच्या रुपाने बाहेर टाकून पुन्हा नव्या जोमाने नव शतकांच्या निर्मितीसाठी तयार होत असावी.त्यामुळे पृथ्वीची ही अवस्था जेव्हा संपेल तेव्हा सर्वत्र एक नवा जोश असेल.नवचैतन्य असेल.कित्येक मनं स्वच्छ होतील.पृथ्वीची अंतर्बाह्य स्वच्छता झाल्याने सारा आसमंत चिरतरुण भासेल.झाडाची पानं गळून नवपालवी फुटलेल्या सुंदर वृक्षासारखी आपली पृथ्वी पुन्हा नवकुमारीका बनेल.निसर्ग लहान,हसऱ्या, गोड बाळासारखा वाटेल.पुन्हा साऱ्या चराचरात चैतन्याचे घट बरसतील.
     म्हणूनच आपल्या पृथ्वीची शतकोत्तर पाळी सुरू आहे.ती सर्व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून स्वत:ला पुन्हा नवचैतन्याने आपल्यासाठी तयार करीत आहे.याची जाणिव ठेवून या संकटाकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया.आजार अति झाल्यावर प्रत्येक जीवाला विश्रांती हवी असते.अगदी तसंच पृथ्वीवरील भार, प्रदुषण, तापमान,हवेदावे सारंच अती झालं. म्हणूनच तर पृथ्वी माता आज या आजारातून बाहेर येण्यासाठी विश्रांती घेत असावी.आपणही तिला समजून घेऊन संयम राखुया.तीची ही विश्रांती खरं तर आपल्या भावी आनंदासाठीच तर आहे.ती एक प्रेमळ माता... आपल्या भावी सुंदर आयुष्यासाठी वेळोवेळी योग्य असा निर्णय घेत असते.पण हे आपणास समजायला हवं.चला तर मग आपल्या पृथ्वी मातेची काळजी घेऊया.
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...