सोमवार, २७ जुलै, २०२०

हसती बागडती पाळी

🌹हसती बागडती मासिक पाळी!🌹

     मासिक पाळी! निसर्गाकडून स्त्री जातीला लाभलेली एक अनमोल देणगी! आकाशात पूर्वेला उगवणारा सूर्य साऱ्या सृष्टीला नवजीवन देतो.अगदी तसंच मानवाला मानवी जीवन बहाल करणारी,मानवी अंकुर तयार करणारी ही मासिक पाळी असते.पण ही सखी आजवर अज्ञानाच्या अंधकारात अडकून वाईटपणाच्या कलंकाने कलंकितच राहिली.ती नसेल तर मानवी जीवन निर्माण होऊच शकत नाही.हे ठाऊक असूनही तिचं महत्त्व पायदळी तुडवलं गेलं.आजवर एक स्त्री मासिक पाळी या नैसर्गिक क्रियेमुळे दूषितच ठरली गेली.खरं तर इतर अवयवांच्या कार्याप्रमाणे मासिक पाळी हे देखील प्रजनन संस्थेचं कार्य! पण आजवर सामाजिक रुढी परंपरा यांनी मासिक पाळी हा विषय जणू काहीतरी भयंकर रहस्य असं समजून तो उगाचंच अवघड, अगम्य बनवून ठेवला.विज्ञानाने देखील एकविसावे शतक उजाडले तरी त्यावर प्रकाश टाकला नाही.ही शिक्षणाची मोठी शोकांतिका आहे.परंतू देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे युनिसेफ, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था या विषयाची जागृती आणण्याचं काम करीत आहेत.ही एक क्रांतीकारक बाब आहे.ज्ञानाची पहाट होऊ पाहत आहे.त्यामुळे मासिक पाळीचे व्यवस्थापन कसं करावं याची माहिती आजच्या महिलांना मिळू लागली आहे.निदान सुंदर अशा बदलाची सुरुवात झाली आहे.ही एक महिला जगतासाठी आनंदाची, मुक्त स्वातंत्र्याची गोष्ट आहे.
     मासिक पाळी व्यवस्थापन याची शास्त्रीय माहिती घेऊन या आपल्या सखीचं आपल्या आयुष्यात हसत खेळत आगमन व्हावं.आपल्या मुली बाळी यापुढे मासिक पाळीला समस्या न मानता सखी मानतील याची काळजी आपणच सुशिक्षित समाजाने घ्यायची आहे.मासिक पाळी बाईच्या शरीराचा हिस्सा असली तरी ती संपूर्ण कुटुंबाची असते.एक निरोगी महिला एक निरोगी कुटुंब निर्माण करीत असते.म्हणूनच मासिक पाळीतील समस्या समजून घेऊन प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील महिलेच्या आरोग्याची काळजी घेतली तर ती महिला निरोगी बाळ जन्माला घालू शकते.म्हणूनच प्रत्येक स्त्री आणि पुरुष वर्गाने मासिक पाळी आणि महिलांचं आरोग्य याचा सहसंबंध समजून घेऊन काळजी घ्यावी.तरच भावी पिढी सुदृढ निरोगी जन्मू शकते.
     आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिन साजरा करण्याचा उद्देश जागृती करणं, मासिक पाळीच्या अज्ञानाने महिलांना होणारे आजार याविषयी मार्गदर्शन करणं, मासिक पाळीचा बाऊ न करता ती सहजपणे स्वीकारणं हाच आहे.म्हणूनच मासिक पाळी समजून घेऊया.अज्ञान संपवून तीला हसती बागडती सखी बनवूया.मासिक पाळीतील अंधश्रध्दा संपवून ती एक सहज अशी शारिरीक क्रिया आहे हे लक्षात घेऊन विचार आता तरी बदलूया.अज्ञानाने आजवर अनेक कळया कोमेजून गेल्या.बालपण अकाली हरवून पोक्त झाल्या.पण ही पाळी बालपण हिरावण्यासाठी येतंच नाही.ती तर येते मुलीला फुलवण्यासाठी,भावी मातृत्वाची चाहूल देण्यासाठी! हेच वास्तव आता सर्वांना सांगूया.आजच्या मुलींना समाजाने, पालकांनी पाळीविषयी सखोल,डोळस ज्ञान दिले तर मुलींचं अकाली बालपण हरवणार नाही.घरातील पालकांनी देखील मुलीच्या पाळीचा बाऊ न करता तीला तीचं बालपण सहजपणे जगू द्यावं.मासिक पाळीचं व्यवस्थापन उत्तम कसं करायचं याची माहिती मिळाली कि, मासिक पाळी कधीच, कशातही अडसर बनतं नाही.म्हणूनच चला तर मग.... मासिक पाळीला समजून घेऊन तीला हसत हसत स्विकारुया.तिला हसती बागडती ठेऊया.
🌹आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

1 टिप्पणी:

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...